आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावाद पेटला:मुंबईच केंद्रशासित प्रदेश करा! कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी; राज्यात संतप्त पडसाद

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसवर बॅनर चिकटवले. - Divya Marathi
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसवर बॅनर चिकटवले.
  • मुंबई वेगळी करण्याचा भाजपचा डाव : काँग्रेस

मुंबई शहर हे पूर्वी मुंबई-कर्नाटक प्रांताचा भाग होते. त्यामुळे मुंबईवर कर्नाटकचाही हक्क असून मुंबईला कर्नाटकात सामील करावे आणि जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत केंद्र सरकारने मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी केली आहे. सावदी यांच्या विधानानंतर महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमावाद चांगलाच पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील सीमावाद प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कर्नाटकच्या कब्जातील बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली होती. त्यावर बंगळुरू येथे बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सावदी यांनी हे अजब तर्कट मांडले. कर्नाटकात भाजपचे सरकार असून सावदी यांच्या वक्तव्याचे गुरुवारी राज्यात संतप्त पडसाद उमटले. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी भाजपवर जोरदार तोंडसुख घेतले. मुंबई वेगळी करण्याचा हा कुटिल डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. तर सावदी हे वेड्यासारखे बरळत आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेनेे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजपने मात्र यावर मौन बाळगले आहे.

नेमके काय म्हणाले सावदी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. महाजन आयोगाचा अहवाल हा अंतिम असून सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आमच्याच बाजूने लागेल. मुंबई शहर हे पूर्वी मुंबई-कर्नाटक प्रांताचा भाग होते म्हणून मुंबईला कर्नाटकात सामील करावे आणि निर्णय होईपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे.

मोदी सरकारचे षड‌्यंत्र - काँग्रेसची टीका : लक्ष्मण सावदी यांच्या विधानातून मोदी सरकारचा कुटिल डाव स्पष्ट झाला आहे. मुंबईला कमकुवत करण्याचे, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे भाजपचे षड‌्यंत्र राहिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईला केंद्रशासित करण्याचा भाजपचा मोठा कट होता, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बुधवारी ‘कर्नाटक बेळगाव सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या डाॅ. दीपक पवार संपादित पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित केला जावा, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली होती.

कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रदेश भाजपची गोची झाली आहे. म्हणून लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्याचा फायदा उठवत महाविकास आघाडीकडून प्रदेश भाजप व केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला गेला आहे.

सावदींनी आधी सीमावादाचा अभ्यास करावा : संजय राऊत
असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक निर्णायक बैठक होती. त्यामुळे कोणी काही बरळले तरी काही फरक पडत नाही. बेळगाव महाराष्ट्रात आलाच पाहिजे ही आमची मागणी आहे. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत हे कर्नाटक सरकारने लक्षात घ्यावे, असेही राऊत म्हणाले.

त्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती करा : वडेट्टीवार
देशात भाषावार प्रांतरचना झाली आहे. मुंबई आणि कर्नाटकचा अर्थाअर्थी संबंध नाही. इतकी साधी गोष्ट ज्याला कळत नाही, असा माणूस उपमुख्यमंत्री असेल तर त्या राज्याचीही कीव करावीशी वाटते. त्यामुळे सावदी यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती केले पाहिजे, अशा शब्दांत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

वक्तव्याकडे दुर्लक्ष करा : अजित पवार
कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून लक्ष्मण सावदी यांनी ते विधान केले आहे. त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. सीमाभागातील ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत आघाडी सरकारने सुचवले आहे. त्याचा मुंबईशी अर्थाअर्थी संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...