आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरण:साध्वी प्रज्ञा आणि समीर कुलकर्णी यांची दोषमुक्तीसाठीची याचिका मागे, कर्नल पुरोहित याचिकेवर ठाम

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2008 मधील मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व समीर कुलकर्णी यांनी​​ मुंबई उच्च न्यायालयातील आपली दोषमुक्तीची याचिका मागे घेतली आहे. मात्र, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे याचिका मागे न घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी केवळ या खटल्याला केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीविरोधातील आपली याचिका मागे घेतली आहे.

288 साक्षीदारांचे पुरावे नोंदवले

विशेषतः मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या या खटल्यात 288 साक्षीदारांचे पुरावे नोंदवण्यात आले. या खटल्याच्या टप्प्यावर दोषमुक्त करण्याच्या तुमच्या याचिकेवर सुनावणी घेतली जावी का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या खटल्यातील आरोपींना केली होती, त्यावर सकारात्मक उत्तर देता न आल्याने दोषमुक्तीची याचिका आरोपींनी मागे घेतली आहे.

विशेष न्यायालयाने फेटाळला होता अर्ज

मुंबई सत्र न्यायालयात हा खटला सुरू होण्यापूर्वीच लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी आणि भोपाळहून भाजपच्या विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत (NIA) स्थापन विशेष न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावून खटल्याला सुरुवात केली होती.

निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव

या आरोपींनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आवश्यक त्या मंजुरीविनाच आपल्यावर कारवाई केल्याचा दावा या आरोपींनी करत या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. प्रसाद पुरोहित यांनी तर हा खटला चालवण्यास केंद्र सरकारनं दिलेल्या मंजुरीलाही हायकोर्टात आव्हान दिलेले होते.

खटल्याच्या या टप्प्यावर..!

या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खटल्याच्या मंजुरीचा मुद्दा आता उपस्थित होऊच शकत नाही, कारण खटला सुरू झाल्याने आता तो मागे पडला आहे. त्यामुळे खटल्याच्या या टप्प्यावर आरोपींच्या दोषमुक्त करण्याच्या मागणीचा विचार केला जाऊ शकतो का? तसे दाखवणारे काही न्यायानिवाडे दाखवा? अशी विचारणा हायकोर्टाने पुरोहित आणि कुलकर्णी यांना केली होती.

हा कामाचा भाग होतो का?

पुरोहित यांच्यावर खटला चालवण्याची दखल घेणे हेच कायद्याने चुकीचे आहे. कारण ते लष्करी अधिकारी असून त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारीच पार पाडत होते. त्याचा कागदोपत्री पुरावाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे, असा दावा पुरोहित यांच्यातर्फे करण्यात आला. त्यावर आरडीएक्ससारखी स्फोटके पुरवणे हेही पुरोहित यांच्या कामाचा भाग होता का? असा प्रतिसवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.

यावर तपासयंत्रणेच्या दबावाखाली साक्ष दिल्याचे एका साक्षीदाराने एनआयएला सांगितल्याचा दावा पुरोहित यांच्यातर्फे करण्यात आला. त्यानंतर एनआयएचा तुमच्या म्हणण्याला पाठिंबा असल्याचे तुमचे म्हणणे आहे का? असा सवाल हायकोर्टानं करताच त्याला पुरोहित यांच्यावतीने नकारार्थी उत्तर देण्यात आले.

मालेगाव स्फोट प्रकरण

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील एका प्रार्थना स्थळाच्या आवारात बॉम्बस्फोट झाला होता. यात 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकजण जखमी झाले होते. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह इतर संशयितांना अटक करण्यात आली होती.

या आरोपींवरदहशतवादी कृत्य करणे, षडयंत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुन्हेगारी कट, खूव, खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे, आणि दोन धार्मिक गटात वैर वाढवणे यांसह स्फोटक पदार्थ कायद्यातील संबंधित तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...