आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया स्फोटके:मनसुख हिरेन यांच्या शरीरावर जखमा नाहीत; हत्या की आत्महत्या गूढ कायम, मृत्यू कसा झाला, पोस्टमाॅर्टेम अहवालात उल्लेख नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ बंगल्यासमोरील स्फोटके प्रकरणातील स्काॅर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. मात्र या अहवालात मृत्यू कसा झाला याचा उल्लेख नाही. मनसुख यांचा व्हिसेरा मुंबईतील रासायनिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. इकडे, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा-रेतीबंदर या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. पोस्टमाॅर्टेम अहवाल घेऊन ठाणे पोलिसांचे पथक हिरेन यांच्या नौपाडा येथील घरी गेेले. त्यानंतर सायंकाळी मनसुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गृहमंत्री-पोलिस महासंचालकांची बैठक
हिरेन मृत्यूप्रकरणी तपासकामाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा घेतला. शनिवारी सायंकाळी ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. नगराळे यांनी तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती दिली. दीड-पावणेदोन तास ही बैठक चालली.

मनसुख यांची सकृतदर्शनी हत्याच : भाजपचा दावा
मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्यानंतर भाजपने आघाडी सरकारला चांगलेच घेरले आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) द्यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. मनुसख यांची हत्या झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असून सरकारला तपासाबाबत गांभीर्य नसल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

शरीरावर जखमा नाहीत, तोंडात बोळे
मनसुख यांच्या शरीरावर मोठ्या जखमा नाहीत, त्यांना दुखापत झालेली नाही, असे पोस्टमाॅर्टेमच्या अहवालात दिसून आले आहे. चेहऱ्यावर जखमा आहेत परंतु त्यांचे तोंड उघडलेले व त्यात रुमाल कोंबलेले दिसून आले ,असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र त्याला दुजाेरा मिळालेला नाही.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : खासदार नारायण राणे यांची मागणी
राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही. संजय राठोड, दिशा सालियान किंवा सुशांत सिंह या सगळ्याच प्रकरणात आत्महत्या दाखवल्या जात आहेत. कोरोना संकट हाताळण्यातही आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

मृत्यूमागची ‘सच्चाई’ समोर आलीच पाहिजे : राऊत
मनसुख यांच्या गूढ मृत्यूमागची सच्चाई समोर आलीच पाहिजे. कारण हा महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्याचे राजकारण करून सरकारला घेरणे चुकीचे आहे, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. स्फोटके प्रकरणात ते महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा छडा लावणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...