आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा वाढता विळखा:​​​​​​​मंत्रालयामध्ये कर्मचारी दिवसाआड काम करणार, मुख्य सचिव संजयकुमार यांनी दिले आदेश

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भात अमरावती येथे गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची दखल घेत मुख्य सचिव संजयकुमार यांनी मंत्रालयात डिस्टन्सिंगचे कठोर पालन करण्याच्या सूचना बुधवारी दिल्या. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, एक दिवसाआड, तीन-तीन दिवस किंवा एक-एक आठवड्याच्या शिफ्टनुसार बोलवा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्रालयात २५ टक्के, त्यानंतर ५० टक्के आणि प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १०० टक्के उपस्थिती लागू करण्यात आली होती. मात्र, मुंबई तसेच राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मंत्रालयात वाढलेल्या वर्दळीमुळे ३५ हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी गर्दी कमी करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यानुसार बुधवारी मुख्य सचिवांनी सर्व विभागांच्या सचिवांना आदेश जारी केले आहेत.

कामात पुन्हा संथपणा येणार
सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही डिस्टनसिंगच्या सर्व उपाययोजना, कोरोनाचे सर्व नियम पाळून काम करता येत असेल तर त्याबाबतही विचार करावा, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. सरकारच्या शिफ्टच्या सूचनांमुळे प्रशासनात पुन्हा संथपणा येणार आहे. त्याचा विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीला फटका बसणार आहे.

राज्यभरात सर्वत्र अलर्ट
विदर्भात अमरावती येथे गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारीदेखील जवळपास आठशेच्या वर रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम या शहरांसह इतर शहरांत प्रशासन सावध झाले असून उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मंत्रालयात गर्दी नकोच
मंत्रालयात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन व्हायलाच हवे. डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याबाबत विभागांनी निर्णय घ्यावा. मंत्रालयात गर्दी होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या शिफ्ट ड्यूटीजमध्ये बोलवा, कामाचे तास विभागून द्या, एक दिवसाआड किंवा तीन दिवसाआड ठराविक कर्मचाऱ्यांना बोलवा. हे करताना कामावर परिणाम होणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...