आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मंत्रालय झाला कोरोनाचा हाॅटस्पाॅट; एकनाथ शिंदेंसह डझनभर मंत्री कोरोनाग्रस्त, मंत्रालयातील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्रालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटवण्याची मागणी

महाराष्ट्र राज्याचा कारभार ज्या इमारतीतून चालवला जातो, ते नरिमन पॉइंटचे मंत्रालय कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरले आहे. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही संसर्ग झाला असून त्यांच्यासह सुमारे एक डझन मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयातील १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. परिणामी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचा निर्णय स्थगित करा, अशी मागणी कर्मचारी-अधिकारी करीत आहेत.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे एकूण ४३ मंत्री आहेत. त्यापैकी अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, वर्षा गायकवाड, डॉ.नितीन राऊत, अस्लम शेख, संजय बनसोडे, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार या मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाला होता. यात आता एकनाथ शिंदे यांची भर पडली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांना अधिवेशनाला हजर राहता आले नव्हते.

मंत्रालयाबरोबरच समोरच्या विधिमंडळ इमारतीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. २१ पेक्षा अधिक विधिमंडळ कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. आजपर्यंत मंत्रालयातील १५ कर्मचारी व अधिकारी यांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. मंत्रालयात सर्व अभ्यागतांना प्रवेश बंद आहे.

मंत्रालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटवण्याची मागणी
कर्मचारी वगळता मंत्रालयात कोणी फिरकत नाही तरी संसर्ग वाढतो आहे. पोलिस किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिलेले नाही. त्यामुळे शंभर टक्के उपस्थितीला मोठा विरोध होतो आहे. मंत्रालयात कोरोना चाचणीची सोय करावी, तसेच उपस्थिती ३० ते ५० टक्के पूर्ववत करावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.

अनेक मंत्र्यांच्या कार्यालयांना कुलूप
छगन भुजबळ, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात या मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी बाधित आहेत. त्यामुळे अनेक मंत्री कार्यालये सध्या कडीकुलपात बंद आहेत. बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असते. मात्र मुख्यमंत्री या बैठकीत ‘मातोश्री’ येथून व्हर्च्युअली सहभाग नोंदवतात. कोरोनाच्या धास्तीने अनेक मंत्री बैठकीला प्रत्यक्ष हजर न राहता घरून सहभागी होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...