आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून पाडव्यानिमित्त शनिवारी (२ एप्रिल) राज्यातील जनतेला ४ मोठ्या भेटी दिल्या जाणार आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चर्नी रोडला मराठी भाषा भवन आणि वडाळा येथे जीएसटी भवनचे भूमिपूजन होत असून ११२ या पोलिसांच्या नव्या हेल्पलाइनचे आणि मुंबईतील मेट्रो ७ व २ ए या दोन मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
मरीन ड्राइव्ह येथे चर्नी रोडवर सकाळी ११ वाजता मराठी भाषा भवन या मुख्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन होईल. मराठी भाषा भवनाचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे. सुमारे २ हजार १०० चौ.मी. क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे. १२६ कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे.
राज्य कर विभागाच्या नियोजित वडाळा-मुंबई येथील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवनाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सकाळी ९ वाजता होणार आहे. प्रस्तावित इमारत उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनोसह सार्वजनिक वाहनाने पोहोचण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी असून जीएसटी कर्मचारी आणि करदात्यांच्या सोयींची संपूर्ण काळजी या इमारतीत घेण्यात आली आहे.
मुंबई मेट्रोच्या दोन नव्या मार्गिकांचे उद्घाटन पाडव्याच्या मुहूर्तावर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मुंबई मेट्रोच्या ७ आणि २ ए या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे. मुंबई मेट्रो ७ दहिसरहून अंधेरी पूर्व आणि मुंबई मेट्रो २ ए दहिसरहून अंधेरी पश्चिम डीएननगरपर्यंत धावणार आहेत. यामुळे आता मुंबईकरांची वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी दूर होणार आहे.
दोन कार्यक्रमांना मुख्यमंत्री प्रत्यक्ष तर दोन लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री आॅनलाइन उपस्थिती लावणार आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील जनतेला फायदा होणार आहे.
राज्यासाठी ११२ डायल योजनेचाही शुभारंभ
राज्यातील नागरिकांना एकाच वेळी सर्व प्रकारची मदत मिळावी या उद्देशाने गृह विभागाने ११२ या डायल ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये तक्रारदार व्यक्तीचा कॉल प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठवला जातो. तक्रार पाहून त्या वेळी तेथून जवळ असलेल्या पोलिस मार्शलला त्याची माहिती पाठवली जाते. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.