आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज मराठी भाषा दिवस असून, या दिनानिमित्त राज्यभर वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत देखील अनेक ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनाचे कार्यक्रम सुरू आहे. त्याच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी जनतेला मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुंबईत महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागाकडून सुरू असलेल्या छापेमारीवर त्यांनी भाष्य केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "मराठी भाषा दिन हा आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जगभरात आजचा दिवस साजरा करायला हवा" असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील इनकम टॅक्स कारवाईवर भाष्य केले. ते म्हणाले की, "हे सगळं राजकारणासाठीच केले जात आहे. हा भाजपाचा प्रचार सुरू झाला आहे. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की, बंगाल पॅटर्न असेल किंवा महाराष्ट्र पॅटर्न असेल, अशा गोष्टी केंद्रीय यंत्रणांकडून वाढत जाणार. निवडणुकीपर्यंत हे सगळं होत जाणार. जेवढं हे लोक केंद्रातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, तेवढा महाराष्ट्र एकवटेल आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील" असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यशवंत जाधव यांच्या घरी धाडी
शिवसेनेचे माझगावमधील नगरसेवक व मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी देखील छापेमारी सुरूच आहे.
अमित ठाकरे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
आज मराठी भाषा गौरव दिन असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी पूत्र अमित ठाकरे यांच्या खांद्यावर एक नवी जबाबदारी सोपवली आहे. याबाबत एक परिपत्रक देखील मनसेच्या वतीने काढण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी पूत्र अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नवी जबाबदारी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर दिलेली आहे. राज ठाकरे यांनी देखील आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केली होती. राज ठाकरे यांनी सक्षमपणे या संघटनेचे नेतृत्व केले होते. त्यामुळे राज ठाकरे अगदी कमी काळातच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी अमित ठाकरेकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. आगामी नाशिक महानगरपालिकेची धुरादेखील त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई देखील अमित ठाकरे मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहे. पक्षाच्या अनेक शाखांमध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अमित ठाकरे यांच्याभोवती असलेल्या वलयामुळे ते सातत्याने चर्चेचा विषयही असतात. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रुपाने अमित ठाकरे यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.