आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज देशासमोर अनेक प्रश्न आणि समस्या आहेत, लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आपण कशा सोडवायच्या असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
शरद पवार म्हणाले की, 12 डिसेंबर माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. या दिवशी माझा वाढदिवस असतो म्हणून नव्हे तर, माझ्या आईचा वाढदिवस असतो म्हणून हा दिवस माझ्यासाठी खास आहे. मी 50 वर्षांचा झालो तेव्हा काही सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला. माझ्या 75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, 15 राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष प्रमुख उपस्थित होते. 81 वा वाढदिवस साजरा करण्याचे औचित्य नाही. मात्र, या कार्यक्रमातून पुढील कामासाठी ऊर्जा मिळाली असल्याचे ते म्हणाले.
पुढे पवार म्हणाले की, लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय असेल अशी बांधणी करायची आहे. समाजावर जे अन्याय अत्याचार झाले, त्याची जाणीव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हवी. अस्वस्थ माणसांशी समरस होणारा कार्यकर्ता व्हायला हवा. समाजातील उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. तो अधिकार त्यांना मिळायला हवा. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
त्या फाईलवर जड हाताने स्वाक्षरी केली
मी कृषिमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी माझ्याकडे एक फाईल आली होती. ती फाईल ब्राझील वरून धान्य आयात करण्याची होती. शेतीप्रधान देशात दोन वेळेचे अन्न मिळू शकत नाही मला वाईट वाटले. मी स्वाक्षरी केली नाही. त्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सही करण्यासाठी विनंती केली. सही केली नसती तर अन्नधान्याचे संकट उभे राहिले असते. परदेशातुन धान्य आयात करण्यासाठी त्यावेळी मी जड हाताने स्वाक्षरी केली. मात्र, त्यानंतर शेतीमध्ये नवीन प्रयोग, तंत्रज्ञानसाठी प्रयत्नशील राहिलो. पुढील काही वर्षात हा देश 18 देशांना अन्न धान्य पुरवणारा देश झाला असल्याचे शरद पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.