आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईत दाखल झाली आहे. आज सकाळपासूनच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या मुंबईतील नियोजित सभेची जोरदार चर्चा सुरू आहे.
या सभेसाठी ओवेसी मुंबईत दाखल झाले असून, थोड्याच वेळ्यात ते सभा घेणार आहेत. मुंबई जमावबंदीचे आदेश लागू केले असून, सभांना परवानगी नाकारण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी देखील एमआयएमच्या सभेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नेमके मुंबईत आज काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाकडून धोका असल्यामुळेच ओवेसींच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे ते म्हणाले होते. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो हे म्हणणे बरोबर नाही. पोलिस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत”, असे ते म्हणाले.
खासदार इम्तियाज जलील काय म्हणाले
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचे ऐकले. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला. हा विचित्र प्रकार आहे. पोलिसांची परवानगी मिळाली आहे.
कुणी खोडा घालू नये म्हणून परवानगीची माहिती लपवली असल्याचेही ते म्हणाले. ज्या लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असेही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचे दाखवून देणार आहोत. अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.