आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हेरिएंट:पिंपरी-चिंचवडमध्ये 3 वर्षीय मुलीला नवीन व्हेरिएंटची लागण, मुंबईत कलम 144 लागू, राज्यात आजवर एकूण 17 ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओमायक्रॉन संसर्गाचे राज्यात शुक्रवारी (ता. १०) आणखी ७ रुग्ण आढळले. यात मुंबईत ३ तर पिंपरी - चिंचवड शहरात ४ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आजवर एकूण १७ ओमायक्रॉन विषाणू बाधितांची संख्या झाली आहे. मुंबईत संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता पुढील दोन दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे.

मुंबईत दोन दिवस कलम 144
मुंबईत 'ओमायक्रॉन'चा वाढता धोका लक्षात घेऊन शनिवारी आणि रविवारी संपूर्ण शहरात 144 लागू करण्यात आला आहे. या काळात मोठमोठे मेळावे, रॅली आणि निषेध मोर्चांवर बंदी असेल. पोलिस उपायुक्त (संचालन) यांनी जारी केलेला आदेश शनिवारपासून सुरू होणार असून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबईत आढळलेले ३ रुग्ण हे ४८, २५ आणि ३७ वर्षाचे पुरुष असून, त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका या देशांमधून प्रवास केलेला आहे. तर, पिंपरी - चिंचवडमध्ये आढळलेले ४ ही रुग्ण नायजेरियावरून आलेल्या व ओमायक्रॉन बाधित आढळेलेल्या महिलेचे नातेवाईक आहेत. आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण आहे. एका रुग्णाने लसीचा एक डोस घेतला आहे, तर एकाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्ष असल्याने लसीकरण झालेले नाही. ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर, ३ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत.

राज्यात १ डिसेंबरपासून अतिजोखमीच्या ११ देशातून ९ हजार ६७८ प्रवासी तर इतर देशातून ५१ हजार ७६१ असे एकूण ६१ हजार ४३९ प्रवासी राज्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुमारे ८९ नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले
अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ९६७८ प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या १२४९ अशा एकूण १० हजार ९२७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यातील अतिजोखमीच्या देशातून आलेल्या व कोरोनाबाधित असलेल्या २० प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या पण कोरोना संसर्ग झालेल्या ५ अशा एकूण २५ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. परदेशातून आलेले व राज्यातील बाधितांमधील एकूण ८९ नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...