आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड- १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (जीनोम सिक्वेन्सिंग) करणाऱ्या मुंबईतील २२१ रुग्णांमधील नमुन्यांचे निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आले. यात डेल्टा व्हेरिएंटचे २४ रुग्ण रुग्ण (११ टक्के), तर डेल्टा डेरिव्हेटिव्हचे १९५ रुग्ण (८९ टक्के) रुग्ण आढळले आहेत. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणूचा संसर्ग वेग कमी असल्याचे आढळून आले आहे. ओमायक्रॉन या नवीन विषाणूचे २ रुग्ण यापूर्वीच आढळून आले आहेत. नमुने संकलित केलेल्या २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील जीनोम सिक्वेन्सिंग लॅब व पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने या पाचव्या जनुकीय चाचणीत कोरोनाबाधित एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २२१ रुग्ण हे मुंबई महानगरातील आहेत. चाचणीचे निष्कर्ष पाहता कोविड लसीकरण वेगाने केल्याने मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, नवीन ओमायक्रॉन विषाणू प्रकाराचा वेगाने प्रसार होण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला इशारा लक्षात घेता सर्वांनी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन यापुढेही कठोरपणे करणे आवश्यक आहे. मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ६९ रुग्ण (३१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ७३ रुग्ण (३३ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ५४ रुग्ण (२५ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ६ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत. लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
लसीकरणाचा फायदा : कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास २२१ पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला, तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या २६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ४७ पैकी १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या २२१ पैकी कोणाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे.
राज्यात ७८९ नवे रुग्ण, ओमायक्राॅनचा एकही नाही
राज्यात गुरुवारी ७८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ५८५ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ९७.७२ एवढा आहे. गुरुवारी ७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. दरम्यान,ओमायक्राॅन विषाणूबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.