आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि मराठवाड्याच्या काही भागात नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि पावसाचे पाणी वस्त्यांत शिरले आहे. सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, मुंबई, कोकण आदी भागात २-३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. एकट्या सोलापूर, सांगली व पुण्यात विविध घटनांत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या तीन जिल्ह्यांत २० हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
सरकारच्या हालचाली :
परतीचा पाऊस, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना निर्देश दिले. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामतीत एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. वायुसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना आहेत. पिकांचे नुकसान, घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
राज्यात कहर :
> पुण्यात २४ तासांत ९६ मिमी पाऊस पडला. शहरात ५० सोसायट्या, घरांच्या परिसरात पाणी शिरले. दौंड-खानोटा गावात ओढ्यात चार जणांचा मृत्यू झाला.
> सांगलीत पावसाशी संबंधित दुर्घटनांत ९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईची पुन्हा तुंबई झाली असून २४ तासांत १०६ मिमी पाऊस झाला.
>पंढरपुरातील घाटाची भिंत कोसळून ६ जणांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी ठेकेदार अशोक इंगोले, हुले एबीआयसह कन्स्ट्रक्शन बीड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
> उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांतही काही जागी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.
सोलापूर :
उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात आलेले पाणी तसेच पावसाच्या पाण्यामुळे भीमा नदी दुपारी ४ वाजता पंढरपुरात २.५६ लाख क्युसेकने वाहत होती. पाणीपातळी वाढल्याने सोलापूर मार्गावरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. शहर व तालुक्यातील ८,४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
अतिवृष्टीची शक्यता :
दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. ४८ तासांत महाराष्ट्र व द. गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढेल. हा पट्टा तीव्र स्वरूपाचा होईल. दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.