आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत तुंबळ तारांबळ!:राजधानीला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले; पाणी तुंबले, वाहतूक ठप्प, वृक्ष कोसळले, चाकरमानी अडकले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुलाबा वेधशाळेत ऑगस्टमधील पावसाचा 22 वर्षांचा विक्रम; कोकणासह प.महाराष्ट्रातही मुसळधार, नद्यांना पूर

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला पावसाने झोडपून काढले. बुधवारी मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक जागी पाणी तुंबले, लोकल रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली, शेकडो वृक्ष कोसळले. मुंबईत वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले अाहे. पुढील काही तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी मुंबईकरांसाठी अलर्ट जारी केला. पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी, रायगड आदी जिल्ह्यांत जाेरदार पाऊस बरसला. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पूर आला आहे.

लोकल रेल्वेमध्ये अडकलेल्या १५० प्रवाशांची केली सुटका

पाणी तुंबल्यामुळे लोकलमध्ये अडकलेल्या १५० प्रवाशांची एनडीआरएफने सुटका केली. बहुतांश भागातील लोकल सेवा ठप्प झाली. मुंबईतील जेजे आणि जसलोक रुग्णालयांत पाणी शिरले आहे. न्हावा शेवा बंदरावरील जेएनपीटीच्या उच्च क्षमतेच्या तीन क्रेन्स जमीनदाेस्त झाल्या आहेत.

मुंबई शहरात १२ तासांमध्ये २१५.८ मिमी पावसाची नोंद

मुंबईत ताशी ३० ते ५० मिमी वेगाने पाऊस कोसळला. कुलाबा वेधशाळेत १२ तासांत २९३ मिमीची नाेंद झाली. हा ऑगस्टमधील २२ वर्षांतील विक्रमी पाऊस आहे. मुंबईत यंदाचा सर्वाधिक २१५.८ मिमी पाऊस पडला. पालघरमध्ये दोनच तासांत तब्बल २६६ मिमी पाऊस कोसळला आहे.

पुढचे २४ तास धोक्याचे :

मुंबईसह उत्तर कोकण तसेच घाट परिसरासाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत. येत्या २४ तासांत या भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे.

भावली धरण भरले :

इगतपुरीतील दीड टीएमसीचे भावली धरण बुधवारी भरून ओसंडून वाहू लागले. गतवर्षी धरण २० जुलैला भरले होते. दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या भावली धरणातील पाणी दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडला जातो.

कोल्हापुरात पंचगंगेची पातळी ३५ फुटांवर, काेयनात ७ टीएमसी

महाबळेश्वरात ३२० मिमी पाऊस पडला. साताऱ्यातील कोयना धरणात २४ तासांत तब्बल ७ टीएमसीची भर पडली. पुण्यातही धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी ३७ फुटांवर पोहोचली आहे. येथील राधानगरी धरण ९० टक्क्यांपर्यंत भरले आहे.

बातम्या आणखी आहेत...