आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटातील बंडखोर आमदारांची उद्या मुंबईत संध्याकाळी 7 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सर्व आमदारांची भेट घेणार आहेत. बैठकीचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. मात्र, बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा तसेच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्व राज्याचे लक्ष असणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्यानेच आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे बोलले जात होते. मात्र, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमध्ये अनेक घटनात्मक मुद्दे निर्माण झाल्याने ही सुनावणी दिर्घकाळ चालणार असल्याचे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच आतापर्यंत रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता मुहूर्त मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
नाराजी टाळण्यासाठी खबरदारी
तसेच, शिंदे गट व भाजपमधून कोणाला मंत्रिपद द्यायची, ही नावेदेखील निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. या नावांची घोषणा केल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदारांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने उद्या बैठक बोलावल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तारावर ते आमदारांची भूमिका समजून घेणार असून मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शिंदे खबरदारी घेताना दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला
दरम्यान, सततची दिल्लीवारी व राज्याच्या दौऱ्यामुळे झालेल्या दगदगीत मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना डॉक्टरांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली. दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींशी फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच घेणार असल्याचे समजते. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच रखडल्याने आजारी असूनही मुख्यमंत्री शिंदे सक्रिय असल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी आज काही ज्येष्ठ वकिलांची भेट घेतली. या भेटीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार, सुप्रीम कोर्टातील निर्णयामुळे निर्माण झालेला घटनात्मक पेच आदींबाबत त्यांनी चर्चा केल्याचे समजते. एकंदर लवकरच मंत्रिमंडळाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.