आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक १४ संवर्गाच्या ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला हजर असलेल्या सर्व उमेदवारांचे आक्षेप व नॉर्मलायझेशन नंतरचे गुण म्हाडाच्या http://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.
सागर म्हणाले, की म्हाडा सरळ सेवा भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराबाबत असहिष्णू धोरण अवलंबिण्यात आले आहे. याच धोरणानुसार परीक्षेच्या वेळी गैरप्रकार करताना आढळलेल्या किंवा गैरप्रकार करण्याच्या प्रयत्नात असणारे उमेदवार / व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस तपासात ज्या उमेदवार / व्यक्तींची नावे समोर येत आहेत त्यांची सर्व माहिती पोलिसांना पुरविण्यात येत असून पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. भरती प्रक्रियेसंदर्भातील पुढील प्रक्रियेमध्ये देखील पूर्ण काळजी घेण्यात येणार असून ज्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीकरता बोलावण्यात येणार आहे, त्या सर्व उमेदवारांचे परीक्षेचे लॉग डिटेल्स तपासण्यात येणार आहेत. लॉग डिटेल्सच्या आधारे त्या उमेदवारांचे वर्तन विश्लेषण करण्यात येणार असून सदर विश्लेषण शंकास्पद असल्यास त्याची योग्य त्या यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कागदपत्र तपासणीकरिता आलेल्या उमेदवारांचे फोटो, दोन्ही हाताचे ठसे व स्वाक्षरी घेण्यात येतील. अर्ज भरताना अपलोड केलेला फोटो व स्वाक्षरी, परीक्षा केंद्रावर त्यांचा काढलेला फोटो व स्वाक्षरी यासोबत पडताळण्यात येईल. फोटो व स्वाक्षरी जुळत नसेल तर त्यास शंकास्पद वर्गवारीमध्ये ठेवून त्यांची चौकशी करण्यात येईल. याच प्रकारची कार्यवाही नियुक्ती पत्रानंतर उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याकरीता येतील त्यावेळीही करण्यात येईल.
म्हाडा सरळ सेवा भरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.