आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“एमआयएम’ पक्षाने आघाडीसाठी सत्ताधारी महाआघाडीतील पक्षांना दिलेली ऑफर हा एक कट आहे. मात्र, झोपेतही एमआयएमसोबत युती करणार नाही. ही ऑफर भाजपकडूनच झाली असून एमआयएम भाजपची बी टीम असल्याची आता खात्री झाली आहे, असा आरोप मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव यांनी पक्ष खासदार व जिल्हाप्रमुखांना रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर मार्गदर्शन केले. उद्धव म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. अकारण एमआयएमने महाविकास आघाडीला राजकीय आघाडीची ऑफर दिली. काही संबंध आहे का? हाच खरा डाव आहे. एमआयएमने ऑफर द्यायची व नंतर भाजपने यावरून टीकेचा भडिमार करायचा. जे औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकवतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही. इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढून शिवसैनिक हिंदुत्वापासून दूर चालले आहेत हे दाखवायचा हा प्रयत्न आहे.
अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली, तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही.
औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवणारी जी औलाद आहे तिच्यासोबत छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचा सैनिक म्हणवणारा शिवसैनिक हा कदापि जाणार नाही आणि मी जाऊ देणार नाही. “पूर्वी इस्लाम खतरे में है’ म्हणायचे, आता ‘हिंदू खतरे में’ अशी नवीन बांग सुरू आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची. इतिहासाच्या खपल्या काढल्या जात असून हा डाव मोडून काढला पाहिजे.
उद्धव म्हणाले... सरसंघचालकांच्या नावापुढे खान, जनाब जोडणार ?
जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय म्हणणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का, असा सवाल उद्धव यांनी केला. तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणून आम्ही मुस्लिमधार्जिणे असू, तर मग त्याच न्यायाने आरएसएसला मुस्लिम संघ की राष्ट्रीय मुस्लिम म्हणणार, असा प्रश्न त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.