आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला ३० वर्षे उलटून गेली. मात्र या मुद्द्यावर महाराष्ट्रात अजूनही राजकारण सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत ‘बाबरी पाडण्याची जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी घेतली असली तरी तिथे एकही शिवसैनिक गेलेला नव्हता,’ असा दावा केला. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांसह भाजप व शिंदे सेनेचा समाचार घेतला. भाजपचे नेते बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत व शिंदे गट त्यांचे चळवे चाटण्यात मग्न आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मात्र सौम्य प्रतिक्रिया दिली. उलट बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते, असा सूचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून सत्तेतील मित्रपक्ष शिंदे गट नाराजी होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर भाजपने हात झटकले आहेत. पाटील यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असून पक्ष त्याच्याशी सहमत नसल्याचे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
टीकेची झोड, भाजपनेही हात झटकताच दादांचे घूमजाव
- शिवसैनिक होते पण हिंदू म्हणून, दिघे यांनी सोन्याची वीट पाठवली होती : चंद्रकांतदादा
- बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात कायम श्रद्धा आहे. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांच्यामुळे मुंबईतील हिंदू जिवंत राहिला.
- राम जन्मभूमीचे आंदोलन १९८३ पासून विहिंप व बजरंग दलाच्या नेतृत्वात सुरू झाले. त्यात सहभागी असलेले ना शिवसैनिक म्हणून ना भाजप म्हणून सहभागी झाले होते. सर्व हिंदू म्हणून आले होते.
- शिवसेनेतून सतीश प्रधानांपासून अनेक कार्यकर्ते अयोध्येत उपस्थित होते. आनंद दिघे यांनी तर राम मंदिरासाठी सोन्याची वीट पाठवली होती.
- ‘मातोश्री’प्रमाणेच माझे उद्धव ठाकरेंशीही चांगले संबंध आहेत. ते काय म्हणाले यावर मी टिप्पणी करणार नाही. बाळासाहेबांचे हिंदू माणसांवरील ऋण कुणीच विसरू शकत नाही.
हिंमत असेल तर शिंदेंनी राजीनामा द्यावा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचे पाईक आहोत असे बोलणारे ‘४० मिंधे’ आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काय करणार? बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत आत्तापर्यंत कधी कुणी दाखवली नव्हती. पण तुम्ही (शिंदे गट) गुलाम झाल्यामुळे भाजपचे लोक आता सातत्याने बाळासाहेबांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. - संजय राऊत, खासदार, उद्धव सेना
चंद्रकांत पाटलांशी भाजप सहमत नाही
रामजन्मभूमी आंदोलनात बाळासाहेब ठाकरेंचा मोठा सहभाग व विचार होता. शिवसैनिक व कारसेवक वेगवेगळ्या पक्षांचे होते, पण त्यांची भूमिका मोलाची होती. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप.
बाळासाहेबांसाठी उद्धव-राजचा एक सूर
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंवर वेळोवेळी टीकेची झोड उठवणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाबरीच्या मुद्द्यावर मात्र उद्धव यांच्या सुरात सूर मिसळला. ‘बाबरी पाडण्याचे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये म्हणून तेव्हा भाजपचेे सुंदरसिंह भंडारी यांनी शिवसैनिकांचे नाव पुढे केले होते. हे कळल्यावर बाळासाहेबांना फोनवरून अनेकांनी विचारणा केली, त्या वेळी ‘जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आताचे पंतप्रधान तर हिमालयात गेले असते,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली. राज ठाकरे यांनीही ट्वीट करून बाळासाहेबांबद्दलचा हाच अनुभव आपण प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगितले. यापूर्वी एका सभेतही राज यांनी हा प्रसंग सांगितला होता. मनसेने आज तो व्हिडिओ शेअर करून बाळासाहेबांवर अविश्वास व्यक्त करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आरोप-प्रत्यारोप
एकाही शिवसैनिकाचा बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात सहभाग नव्हता. बाळासाहेब ठाकरे तरी तेथे कधी गेले होते का? - चंद्रकांत पाटील
बाबरी पाडल्यानंतर काही उंदीर लपून बसले होते. तेच बाळासाहेबांचे महत्त्व कमी करत आहेत. मिंधे गट मात्र त्यांचे तळवे चाटत आहे. - उध्दव ठाकरे
बाबरी पाडताना पक्ष वगैरे काही नव्हते, सगळे रामभक्त होते. मात्र माझ्या अयोध्या दौऱ्यावर टीका करणारे तेव्हा कुठे होते? - एकनाथ शिंदे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.