आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या वक्तव्यावर अखेर भाजपचा आक्षेप:आशिष शेलार म्हणाले, वक्तव्य पूर्णपणे चुकीचे; समर्थन करत नाही- मंत्री बावनकुळे

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी आपण राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अशी भूमिका मांडली आहे.

विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे.

पाठराखण करत नाही- बावनकुळे

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत जे काही वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. आम्ही राज्यपालांची पाठराखण करत नाही. मात्र, शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न राज्यपालांनी केला असेल असे वाटत नाही. तरीही राज्यपालांच्या वक्तव्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन होत असेल तर भारतीय जनता पक्ष अशा वक्तव्याचे समर्थन करणार नाही. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच काम करत आहे.

वक्तव्य पूर्ण चुकीचे - शेलार

सध्या गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेलेल्या आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली. आशिष शेलार म्हणाले, राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत जे काही वक्तव्य केले, त्याच्याशी आम्ही पूर्ण असहमत आहोत. राज्यपालांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे.

फडणवीसांच्या भूमिकेवरून सारवासारव

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपालांची पाठराखण केली आहे. राज्यपालांना शिवाजी महाराजांना कमी लेखायचे नव्हते, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली आहे. त्यावर आशिष शेलार म्हणाले, फडणवीसांची भूमिका त्या वक्तव्याशी सहमतीची नाहीये. तर, राज्यपालांनी चुकीच्या भूमिकेतून तसे वक्तव्य केले नाही, असे फडणवीसांचे म्हणणे असल्याची सारवासारव आशिष शेलारांनी केली.

राज्यपालांची अद्याप माफी नाही

राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राज्याच्या कानाकोपऱ्यात संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी शेकडो ठिकाणी आंदोलने केली. मात्र कोश्यारी यांनी अद्याप आपले वक्तव्य मागे घेतले नसून दिलगिरीही व्यक्त केली नाही.

बातम्या आणखी आहेत...