आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2009 पासून शिक्षक त्रस्त:मंत्र्यांचा शिक्षक बदली धोरणाचा खेळ सुरूच; पंकजांचा निर्णय मुश्रीफांनी बदलला, ग्रामविकासमंत्र्यांनी फिरवला

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सरकार बदलले की शिक्षकांच्या बदल्याचे धाेरण बदलले जाते आहे. २००९ पासून राज्यात शिक्षक बदल्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ चालू आहे. शिंदे -फडणवीस सरकारने मंगळवारी (२२ मे) शिक्षक बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले. मात्र बहुसंख्य जिल्हा परिषदांची बिंदु नामावली प्रलंबित असल्यामुळे शिक्षकांच्या बदल्या होणार कशा, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला आहे.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यात एकाही शिक्षकाची यापुढे बदली होणार नाही, अशी घोषणा केली. त्याला आठ दिवस उलटत नाहीत तोच ग्रामविकास विभागाने शिक्षक बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले. राज्यात दरवर्षी सुमारे ७ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होतात. २०२१ च्या आंतरजिल्हा शिक्षक बदली धोरणात किरकोळ सुधारणा करत नवे धोरण आणले आहे.

पूर्वी शिक्षकांना बदली पोर्टलवर स्वत: अर्ज भरण्याची मुभा होती. नव्या धाेरणात मात्र अर्ज गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या देखरेखीत करायचा आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी मागासवर्गीय कक्षाकडुन बिंदु नामावली तपासली असावी, असे बंधन आहे. मात्र बहुतांश जिल्हा परिषदांनी बिंदु नामावली अद्ययावत केलेली नाही, परिणामी आंतरजिल्हा बदल्या पुरेशा प्रमाणात होणे शक्य नाही, असा दावा राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्ययक्ष बाळकृष्ण तांबेरे यांनी सांगितले.

सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर हे जिल्ह्ये राज्याला शिक्षकांचा पुरवठा करतात. त्यामुळे या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र इच्छुक शिक्षकांची इच्छा फलद्रूप होण्यास बिंदुनामावलीचा ब्रेक लागल्याने नवे धोरण कुचकामी ठरणार आहे.

पाठशिवणीचा खेळ
२०१४ मध्ये तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आॅनलाइन बदल्यांचे धाेरण आणले. २०२१ मध्ये महाविकास आघाडीचे मंत्री हसन मुश्रीफांनी ते आॅफलाइन केले. शिंदे सरकारमध्ये गिरिश महाजन यांनी थोडासा बदल करत पुन्हा आॅनलाइन बदल्याचे धोरण केले. एकुण शिक्षक बदल्यात पाठशिवणीचा खेळ चालू आहे. तो कधी थांबणार असा शिक्षकांचा सवाल आहे.

काही जुने नियम ठेवले कायम
बदली इच्छुकांचे तीन संवर्ग केले आहेत. पहिला गंभीर रुग्ण असलेल्या शिक्षकांचा. दुसरा पती-पत्नी एकत्रीकरणाचा तर तिसरा संवर्ग सर्वसाधरण शिक्षकांचा आहे. सर्वसाधारण संवर्ग मध्ये इच्छुकांचे अधिक अर्ज आल्यास सेवाज्येष्ठता निकष असेल. तसेच शिक्षकाची त्या जिल्ह्यात ५ वर्षे सलग सेवा हवी. रिक्त जागांचे प्रमाण १० टक्के पेक्षा कमी असावे, असे जुने नियम कायम आहेत.