आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेचे पारडे आणखी जड:आमदार दिलीप लांडे गुवाहाटीत पोहचले, रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत

गुवाहाटीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आमदार दिलीप लांडे गुवाहाटीत पोहचले आहेत. यावेळी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये शिंदे गटातील इतर आमदारांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिलीप लांडे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आता तेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या गटात सहभागी झाले आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे.

दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे आमदार आहेत. दिलीप लांडे मनसेमधून शिवसेनेत गेले होते. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लांडे निवडून आले आहेत. दिलीप लांडे यांच्याशिवाय काल (22 जून) शिंदे यांच्या गटात आणखी चार आमदार सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे शिंदे गटात सामील झाले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला आहे. हे चारही आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच इतर आमदारांनी त्यांचं स्वागत केलं. शिवाय एकनाथ शिंदे देखील यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेला खिंडार

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेच्या तब्बल 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास 40 आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.

संध्याकाळी मातोश्रीवर बैठक

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी उधळून लावण्यासाठी शिवसेनेकडून पाऊले उचलली जात आहेत. आज दुपारी शिवसेनाभवनात एक बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आदित्य म्हणाले की, कुटुंबप्रमुखाला धोका देता याचे वाईट वाटते. धोका मित्रपक्षांनी दिला असता, तर समजू शकलो असतो. राज्यातील सर्व जनता उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी अजय चौधरी यांना मान्यता दिली आहे. याशिवाय, शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे.