आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ आठ दिवसांच्या कालावधीत झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाराेपावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणांची खैरात केली. विशेष म्हणजे अपापल्या मतदारसंघात परतणाऱ्या आमदारांना स्थानिक विकास निधी चार काेटी रुपये करण्याची घोषणा करून खुश करून टाकले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावरील तरतुदींवर शरसंधान करताना वीज बिलाच्या बाबतीत काहीच निर्णय नसल्याने नाराजी व्यक्त करीत काेविड काळातील भ्रष्टाचार समाेर आणला.
अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस हाेता. विषयपत्रिकेवरही बरेच विषय हाेते. दुपारनंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवात करताना आपल्या नेहमीच्या शैलीत राज्य सरकारवर टीका केली. माेठ्या रकमेच्या घर खरेदीवर महिलांना ही सवलत कशासाठी, असा सवाल करीत त्यासाठी मर्यादा आणण्याची मागणी केली. ठाकरे स्मारकाला निधीच नाही, हीच का शिवसेना, असा चिमटा काढला. राज्याची परिस्थिती ढासळली अाहे. राज्याला वाचवण्यासाठी ‘तुम्ही पुन्हा या’ असे फडणवीसांनी उद्देशून म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कारभारावर टीका करीत वीज बिलाच्या बाबतीत निर्णयच घेतला नाही, काेविडच्या काळात साेलापूर, लातूर आदी ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले.
कुणीही ताम्रपट घेऊन येत नाही : नेहमी सरकार बरखास्तीचीच भाषा बाेलणाऱ्या मुनगंटीवार यांच्यावर टीका करत ते म्हणाले, त्यांची अवस्था सांगताही येत नाही अन् सहनही हाेत नाही अशी झाली आहे, कुणीही ताम्रपट घेऊन येत नाही. सरकारमध्ये नसल्याचे शल्य त्यांना बाेचते अाहे. पवारांनी आपल्या भाषणात घोषणांची खैरातच केली. सध्याच्या स्थितीत राज्याच्या जीडीपीच्या तीन टक्के तूट आली अाहे. तर देशाची हीच तूट ९.५ टक्के इतकी अाहे, असे सांगून तरीही दिलासा देणारा निर्णय घेत अाहेत, असे सांगितले. ठेकेदारांसाठी ई-निविदा प्रणाली १० लाखांपर्यंत वाढवण्यात आली. सर्व वेतन पूर्ववत केले जाईल. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा तीर्थक्षेत्र विकासात समावेश केला अाहे. मराठी भाषा भवन मरीन लाइन्सजवळील बाल भवनजवळ उभारले जाईल. चर्मकार, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, शेळी-मेंढीपालन या सर्व महामंडळांसाठी प्रत्येकी १०० काेटी रुपये देण्याची घाेषणा केली. आंबेडकर स्मारकाचे काम १४ एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. साळवे स्मारकाचे कामही वेळेत हाेईल.
मनाेरा आमदार निवासाच्या कामाचे टेंडर लवकरच दिले जाईल, अशा विविध घाेषणा करताना त्यांनी आमदार निधी वर्षाला चार काेटी रुपये असेल, त्यासाठी तीन हजार पाचशे काेटींचा भार पडेल, अशी माहिती दिली.
विकास निधी वाढला, विराेधकांनीही केले स्वागत
अजित पवारांनी राजकीय फिरकी घेत घोषणांची खैरातच केली. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार काेटी रुपये वर्षाला मिळेल, त्यासाठी ३५०० काेटी रुपयांचा भार पडेल, असे म्हणताच सरकारवर टीका करणाऱ्या विराेधकांसह सर्वांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.
अशाेक चव्हाणांचे निवेदन
तत्पूर्वी सभागृहात अशाेक चव्हाण यांनी मराठा आरक्षणप्रश्नी झालेल्या घडामोडींची माहिती देऊन केंद्र सरकार वेगळी भूमिका घेत अाहे, राज्यातील भाजप नेते राज्यात एक, केंद्रात एक आणि सभागृहात एक अशा तीन भूमिका मांडत असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.