आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:काँग्रेसचे बंड झाले थंड, मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणूक होणार बिनविरोध

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संकटानंतर राजकीय दिशा ठरवणार : खडसे

विधान परिषदेवरील ९ रिक्त जागांच्या निवडी बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ५ जागा लढवण्यावर एकमत झाले. दि.१४ मे रोजी उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे त्यामुळे त्याच दिवशी उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. 

महाविकास आघाडीकडे ५ आणि भाजपकडे ४ उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. पण काँग्रेसने ६ जागा लढवण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे आघाडीत संभ्रम होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक बिनविरोध हवी होती. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आघाडी नेत्यांची रविवारी बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील,  शिवसेना नेते  एकनाथ शिंदे,  अनिल परब, खासदार संजय राऊत तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात आणि  अशोक चव्हाण उपस्थित होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विनंती, काँग्रेसची सहमती  

दीड तास चाललेल्या बैठकीत ५ जागा लढण्यावर एकमत झाले. त्यानंतर उभय नेते प्रसिद्धी माध्यमांना सामोरे गेले. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आघाडीकडून ५ जागा लढवण्यात येतील, असे जाहीर केले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे. अशा काळात आमदारांना मतदानासाठी मुंबईत बोलावणे धोक्याचे आहे. मुख्यमंत्री स्वत: उमेदवार आहेत. निवड बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली. त्यामुळे ५ जागा लढवण्यास काँग्रेसने सहमती दिल्याचे थोरात म्हणाले.

अंबाजोगाईच्या मोदींचा पत्ता कटला

काँग्रेसच्या वतीने बीड काँग्रेस  जिल्हाध्यक्ष अंबाजोगाईचे राजकिशोर ऊर्फ पापा मोदी यांचेही नाव जाहीर करण्यात आले होते.परंतु  कोरोना साथीच्या काळात राजकारण हाेत असल्याने मुख्यमंत्री व्यथित आहेत, असे संजय राऊत यांनी दुपारी सांगितले. त्यानंतर बैठक झाली. 

कोरोना संकटानंतर राजकीय दिशा ठरवणार : खडसे

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कोरोना संकट संपल्यानंतर आपण पुढील राजकीय वाटचालीबद्दल निर्णय घेणार असल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.  तिकीट नाकारल्याने माझ्यावर अन्याय झाला आहे. परंतु कोरोना संंकटाच्या काळात राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेणे उचित नसल्याने परिस्थिती निवळल्यानंतर काय ते ठरवू, असे खडसे यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांसह आघाडीचे उमेदवार आज अर्ज भरणार : भाजप उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीच्या सर्व ५ उमेदवारांचे अर्ज (दि.११) दाखल होणार आहेत.

कालावधी घटला : मुख्यमंत्र्यांना ६ महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्यक असते. उद्धव ठाकरे  यांची ती मुदत २७ मे रोजी संपत आहे. आघाडीने ६ उमेदवार दिल्यास निवडणूक झाली असती. २१ मे रोजी मतमोजणी होती. नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ घ्यावी लागते. आता  निवडणूक बिनविरोध होणार असल्याने १४ मे रोजी उमेदवारांच्या निवडीची घोषणा होईल.

विधानसभा पक्षीय बलाबल :

- भाजप १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, छोटे पक्ष १६ तर अपक्ष १३ आमदार आहेत. - एका उमेदवारास विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीची २९ मते  (कोटा) आवश्यक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...