आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे मविआला देणार राजकीय धक्के:लवकरच विदर्भ दौऱ्यावर, मुंबईत गणेश मंडळांना भेटी देत पालिका निवडणुकीची तयारी

प्रतिनिधी/नागपूर, मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी अलिकडे खूप वाढल्या आहेत. नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरेही 17 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. विदर्भातील मनसे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यासोबतच आघाडीला धक्का देण्याची तयारी ठाकरे यांनी केल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे, मुंबईतही राज ठाकरे गणेश मंडळांना भेटीगाठी देत आहे. आज राज ठाकरे यांनी लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच नरेपार्कच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे व मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर यांच्याह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित होते. मुंबई पालिका निवडणुकीची ही तयारीच असल्याचे बोलले जात आहे. मुंबई पालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट व मनसे एकत्र येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, विदर्भातही राज ठाकरे आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

विदर्भात भाजप-मनसे एकत्र?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-मनसे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असला तरी आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप-मनसे एकत्र लढणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. सोबतच चंद्रपूर आणि अमरावती या महानगरपालिकांच्याही निवडणुका मनसे पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती आहे.

राज ठाकरे 17 सप्टेंबरला नागपुरला

राज ठाकरे येत्या 17 सप्टेंबरला नागपूरला येणार आहेत. येथून चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. या दौऱ्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते चर्चा करतील. आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षाचा विचार सुरू आहे. इतर पक्षाचे लोक मनसेमध्ये प्रवेश करतील, त्यादृष्टीनेही तयारी सुरू झालेली आहे.

17 आणि 18 सप्टेंबर असे दोन दिवस राज ठाकरे विदर्भात येणार आहे . या दौऱ्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, अमरावती जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील चार दिवस आधी नागपुरात तळ ठोकून बसणार आहेत. या कालावधीत दौऱ्याच्या तयारीचा आढावा हे नेते घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

आघाडीला रोखण्यासाठी मास्टर प्लॅन

महाविकास आघाडीची एकत्रित ताकद कमी करण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे सोबत लढणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. याचीच चाचपणी करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे येत्या 17 सप्टेंबरला नागपूरला येत आहेत. भाजप आणि शिवसेनेतील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणे शक्य नाही. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा एकत्रितपणे लढण्यासाठी मास्टर प्लान आखला जात आहे.

काँग्रेसचा आघाडीला विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यापूर्वीच महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने काँग्रेस यास फारसा विरोध करणार नाही. मात्र विदर्भ आणि खासकरून नागपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांचा आघाडीला विरोध आहे. नागपूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. सेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे काँग्रेस 150 पैकी 50 जागाही सोडायला तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढण्यास भाजपला त्याचा फारसा त्रास होणार नाही.

मिशन मुंबई

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर असली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप मोठ्या ताकदीने प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात राज ठाकरे यांनाही सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जर भाजपसोबत युती केली, तर मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला मोठी मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...