आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपल्यासह आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
पत्र हिंदी भाषेत असून त्यात ऊर्दू शब्द असल्याची माहिती नांदगावर यांनी दिली. तसेच राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भोंग्यासंदर्भात घेतलेली भूमिका बंद करावी, नाहीतर जीवे मारण्यात येईल, अशी धमकी पत्रात दिली असल्याचे नांदगावर यांनी सांगितले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बाळा नांदगावकर यांच्या सुमारे 20 मिनीट चर्चा झाली. यानंतर ते शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. तर बाळा नांदगावकर यांनी काल मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे.
दरम्यान मनसेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिस नोटीसा पाठवत आहेत. मनसेविरोधातील कारवाईवर राज ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत -जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही', असा इशारा त्यांनी दिला होता.
मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेत राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबईसह राज्यातील २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे, तडीपार नोटीस बजावणे यासारख्या कारवाया करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.