आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेल की बेल?:महिला पोलिस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींच्या जामिनावर 17 मे रोजी सुनावणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली, त्यानंतर आता पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मशिदींवरील भोग्यांविरोधात मनसेने आंदोलन केले होते. त्यावेळी महिला पोलिसाला मनसेकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर संदीप देशपांडे, संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. तेव्हापासूनच मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरू आहे. पण बेपत्ता असलेल्या दोन्ही मनसे नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली आहे. संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला भोईवाडा कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत मशिदींवरील भोंगे काढायला 4 मे चा अल्टिमेटम दिला होता. प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन्ही नेत्यांनी कारमधून पळ काढला. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाली होती. त्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशपांडे यांच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रांचकडून विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. मुंबईसह उरण, कर्जत भागात या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. 4 मे रोजी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थाबाहेर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना देशपांडे आणि धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत निसटले होते. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून देशपांडे पोलिसांच्या रडारवर आहेत.

काय आहे प्रकरण?

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी संवाद साधणे झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच त्यांनी पळ काढला. त्यांची गाडी भरधाव वेगाने जात असताना एक महिला पोलिस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...