आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचे थैमान सुरू आहे. 'गुलाब' चक्रीवादळाने तर संपूर्ण राज्यातील अनेक भागांची दुर्दशा केली आहे. धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत, नद्यांना पूर आलाय, तलाव-बंधारे फुटले आहेत, रस्ते पाण्याखाली गेली आहेत. अनेकांच्या डोक्यावरील छतच पाण्याखाली घेलं आहे. तर शेतजमिनींचे रुपांतर हे तळ्यात झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच प्रतेयक नुकसानग्रस्ताला 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
राज ठाकरेंनी पत्रात नेमके काय लिहिले ?
'महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत रहातील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला शेतकऱ्याला ५०,००० रूपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्ष शीघ्र कृतीची गरज आहे.'
'प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत रहातील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.