आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी पाट्यांच्या निर्णयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया:'बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच'

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. 'मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबरच इतर भाषांतही लिहू शकतो. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषांतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.' असा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता या निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली आहे. याचे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकाचेच असे ते म्हणाले आहेत. यासंदर्भात ट्विटरवर त्यांनी पत्र शेअर केले आहे.

राज ठाकरेंच्या पत्रात काय?
'या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.'

'महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका.'

सरकारच्या निर्णयात नेमके काय?
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.'

बातम्या आणखी आहेत...