आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी भाजपची 'B' टीम:अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला 'यु' टर्न म्हणजे शरद पवार भाजपची स्क्रिप्ट वाचत आहे का? मनसेचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपची भूमिका राष्ट्रवादी मांडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे का?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी जेपीसीवरुन घेतलेल्या भूमिकेवरुन मनसेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या संबंधांवर शंका उपस्थित केली आहे.

अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत मांडले. यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी जेपीसी चौकशीच व्हायला हवी अशी भूमिका मांडली. संजय राऊत यांनीही सत्य समोर येण्यासाठी जेपीसी गरजेचे असल्याचे म्हटले आहे. पवारांच्या भूमिकेवरुन विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत.

दुसऱ्यांवर आरोप करणारे

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, भाजपची भूमिका राष्ट्रवादी मांडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे का?, तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करत असतात की ही भाजपची बी टीम आहे तर तुम्ही भाजपची स्क्रिप्टच पवार साहेब वाचून दाखवत आहेत का, नेमके काय आहे. अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला यु टर्न म्हणजे राष्ट्रवादी भाजपनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहे का? असा सडेतोड सवाल मनसेने विचारला आहे.

अयोध्याला जायचा अधिकार सगळ्यांना

महाविकास आघाडीत शरद पवारांच्या भूमिकेमुळे फुट पडली का, यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, त्यांच्यात एकजूट होतीच कधी. पहिल्यापासून यांच्या एकमेकांमध्ये तंगड्या घातलेल्याच आहेत. त्याचप्रमाणे अयोध्याला जायचा सगळ्यांना अधिकार आहे. प्रभू रामाचे दर्शन घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. राज ठाकरे जेव्हा सांगतील तेव्हा आम्हीही अयोध्याला जाऊ, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

पवारांवर टीका, भाजपचे उत्तर

अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत मांडले. यावरुन काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय वर्तुळात या जवळीकीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, जेपीसीमध्ये लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे 15 खासदार असतील. उर्वरित 6 ते 7 खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे.

संबंधित वृत्त

राजकारण:शरद पवारांवर काँग्रेसची टीका, देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत मांडले. यावरुन काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय वर्तुळात या जवळीकीमुळे चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर