आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्याचे राजकारण:राज ठाकरेंच्या आदेशाचे मनसैनिकांकडून पालन, घाटकोपरमध्ये लाऊड स्पीकरवर लावली हनुमान चालीसा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांनी काल गुढी पाडव्याच्या सभेत मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. आज राज ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. विशेष म्हणजे रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केली आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले आहे.

विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयासमोर दोन लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. त्यावर हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र लावण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत. हे फक्त आजच्या दिवस वाजणार नाही रोज वाजविण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मशीदीवरील भोंगे हटवायचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन होत नाही. आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत आहोत. माझ्या धर्माचे पालन करण्याचा मला अधिकार आहे. त्यांना स्पिकरवरून अजाण म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांना विरोध नाही. पण, आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत असू तर त्यात गैर काय असा सवाल महेंद्र भानुशाली यांनी केला आहे.

घाटकोपर मनसेच्या वतीने आज विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी आपल्या कार्यलयावर महादेव मंदिर समोर झाडावर स्पीकर लावत हनुमान चालीसा लावली होती. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...