आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
योगी आदित्यनाथ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ते येथे दाखल झाले आहेत. आज ते बॉलिवूडमधील दिग्गजांच्या भेटी घेत आहेत. मात्र त्यांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेने योगींना ठग म्हणत थेट भाजपच्या कार्यालयाबाहेरच होर्डिंग लावले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2 डिसेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर महाविकास आघाडीकडून टीका तर भाजपकडून समर्थन सुरू आहे. यावेळी ते बाँलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचे वैभव असलेल्या बॉलिवूडला हलवायचे आहे. त्याच्या या कृतीमुळे मनसेने त्यांच्यावर हल्लाबोल करत होर्डिंग लावले आहेत.
दरम्यान आज योगी आदित्यनाथ हे ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा 'ठग' म्हटले आहे. तसेच भाजपच्या कार्यालयाबाहेरही हे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
या होर्डिंगवर लिहिले आहे की, 'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली.., कुठे महाराष्ट्राचं वैभव...तर कुठे युपीचं दारिद्र. भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचे मुंगेरीलालचं स्वप्नं.' 'अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग" असे मजकूर असलेले होर्डिंग योगी आदित्यनाथ थांबलेल्या हॉटेलच्या परिसरात लावले आहे.
मुंबईत योगी सरकारची जाहिरातबाजी
उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी देशाची नवी ओळख करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. दरम्यान मुंबईतील माहिम भागात बस स्थानकावर योगी सरकारची जाहिरात लावण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सूचना आणि जनसंपर्क विभागाच्या जाहिरातीत 'काम दमदार योगी सरकार' असा नारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटी देशाची नवी ओळख होईल असेही या जाहिरातीत म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.