आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिकांना अटक झाल्यानंतर जल्लोष करणे मोहित कंबोज यांना महागात पडले आहे. मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सांताक्रुझ पोलिस ठाण्यात मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याबद्दल हा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल करण्यात आल्याचे समजते. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबधित असलेल्या लोकांकडून जमीन खरेदीच्या प्रकरणात मलिक ईडीच्या रडारवर आहेत. मलिकांना बुधवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या ईडीकडून मलिकांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते. मलिकांना अटक झाल्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात कंबोज यांनी नवाब मलिकांवर खळबळजनक आरोप केला होता. नवाब मलिक हे डान्सबार आणि वेश्या व्यवसायाचे रॅकेटमध्ये सहभागी असून, आपण हे सर्व पुरावे तपास यंत्रणांना देणार आहोत. असा खुलासा कंबोज यांनी केला. त्यामुळे कंबोजमुळे नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांचे संबंध असल्याचा खुलासा मलिकांनी केला होता. तेव्हापासून मोहित कंबोज यांचे नाव ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आले होते. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काही दिवसांपूर्वीच मोहित कंबोज आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीचा खुलासा केला होता. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे फ्रंट मॅन असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.
आठ तास चौकशीनंतर मलिकांना अटक
अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात ईडीचे पथक बुधवारी पहाटे साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी धडकले. ईडी कार्यालयात 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक झाली. विशेष न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. या सर्व घटनाक्रमामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादीचे आंदोलन
मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून, आज राज्यभर केंद्र सरकार आणि भाजप विरोधात आंदोलन सुरू आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.