आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता काही दिवसांचा सोबती:राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात; आज विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरेल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

पावसाला पोषक वातावरण

राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहील तसेच, उन्हाचा चटका व उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.

या शहरांना यलो अलर्ट

आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

8 ऑक्टोबरला मुंबईतून निरोप घेणार

वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून माघारी परतला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. परतीची ही सीमा मंगळवारपर्यंत कायम होती, असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

यामुळे राज्यात पाऊस

पश्चिम- मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून वायव्य उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

ऑक्टोबर हीटचा चटका

राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा 30 ते 36 अंशांदरम्यान आहे. तापमानात वाढ होत असल्याने ऑक्टोबर हीटचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे 23 लाख हेक्टरहून अधिक शेतजमीन बाधित झाल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...