आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागच्या राजाला आईचे भावनिक पत्र:'रांगेतल्या प्रकारामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले अन् तिने स्वतःला संपवले'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दुरुनदुरुन भाविक येत असतात. मात्र सध्या येथील पेटीत आलेल्या एका पत्रामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 2019 मध्ये लालबागच्या राजाच्या रांगेत घडलेल्या प्रकारामुळे एका मुलीने स्वतःचे जीवन संपवले होते. तिच्या आईने पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

गणेशोत्सवाला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. त्याचबरोबर यंदा 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. याठिकाणी राजकारणी, सेलिब्रिटींची मोठ्या प्रमाणावर येत असतात. दरवर्षी लालबागचा राजाच्या पेटीत असंख्य पत्रे येतात. यात एक भावनिक पत्र सध्या चर्चेत आहे.

आईचे पत्र जसेच्या तसे

कोरोना संकटानंतर लालबागचा राजा येत आहे. पण त्याच्या दर्शनाची आस लागलेली मुलगी आज आता या जगात नाही. 2019 साली लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी आठ तास उभे होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने तिचे पाय दुखून रांगेत उभं राहणं अशक्य झालं. तेव्हा ती जवळच उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल अशी काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तरे दिली. ते सगळं ऐकून संतापलेल्या मुलीने मला रांगेतून बाहेर काढले. दर्शनासाठी न थांबताच घरी नवी मुंबईत आणले. तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याच दिवशी संध्याकाळी गळफास लावून तिने स्वतःला संपवले.

आईचे पत्र.
आईचे पत्र.

या पत्रात कोपऱ्यात एक चित्र काढलं आहे, ते चित्र माझ्या मुलीने काढलं आहे. ते चित्र माझ्या मुलीची शेवटची आठवण ठरले. हे चित्र लालबागच्या राजाच्या पेटीत ठेवायचे होते. कार्यकारी मंडळ नवसाच्या पेटीतील योग्य सूचनेप्रमाणे कृती नक्की करते हा तिचा विश्वास होता. ही तिची इच्छा शेवटची इच्छा ठरली. म्हणून आम्ही हे पत्र आणि चित्र बाप्पाच्या चरणी वाहतो आहोत. ती पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला यावर्षी किंवा पुढच्या वर्षी बसायला बाक किंवा खुर्च्या देऊ शकला तर तिच्या दिवंगत आत्मयाला शांती मिळेल अशी आमची भाबडी समजूत.

- मुलीचे दुःखी आई, वडील आणि बहीण

तिच्या आत्म्याला शांती मिळावी

आपल्या मुलीची दर्शनाची अधुरी इच्छा पूर्ण व्हावी, तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या लोकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात यावी असे मुलीच्या आईने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र लालबागचा राजा व्यवस्थापक मंडळाने यास दुजोरा दिलेला नाही. असे कोणतेही पत्र आपल्याला मिळाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. पत्र मिळाल्यास त्यावर आम्ही विचार करू, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

आत्महत्या पर्याय नाही

खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी सदर मुलीच्या आत्महत्येबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आत्महत्या हा काही कोणत्याही गोष्टीवरचा उपाय नाही. त्यामुळे आत्महत्यांसारख्या घटनांकडे नागरिकांनी वळू नये. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

बातम्या आणखी आहेत...