आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेच्या मतांची गोळाबेरीज:शिवसेनेतील हालचाली वाढल्या, आमदारांना वर्षा बंगल्यावरुन थेट हॉटेल रिट्रीटमध्ये हलवले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांसह विरोधी बाकावरील भाजपही आपल्या आमदारांच्या मतांची फोडाफोड टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसून येत आहे. याअंतर्गत सोमवारी शिवसेना आमदारांचा मुक्काम मडमधील हॉटेल रिट्रीटमध्ये हलवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी 6 वा. वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार तथा सेना समर्थक लहान पक्ष व अपक्ष आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्वच आमदारांना थेट हॉटेलकडे रवाना करण्यात आले.

आमदार फोडले जाऊ नये म्हणून शिवसेनेने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ते 10 जून हे तीन दिवस आमदारांना मुंबईत ठेवण्यात येणार आहे. यापुर्वी शिवसेनेकडून सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली होती. पण, याच हॉटेलमध्ये भाजपचे आमदार राहणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर शिवसेनेने आपली व्यूहरचना बदलली. शिवसेनेने आमदारांसाठीचे ट्रायडंटचे बुकिंग रद्द केले आणि रिट्रीटमध्ये आमदारांसाठी बुकिंग केले.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरविल्यानंतर भाजनेही माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काय आहे संख्याबळ?
महाविकास आघाडीकडे 169 आमदार ( शिवसेना 55 राष्ट्रवादी 54 काँग्रेस 44 इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 )
भाजपकडे 113 (भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5)

चुरस वाढली

विधानसभेत भाजपचे 106, शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेसचे 44 या संख्याबळानुसार भाजप 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष व छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने शिवसेनेचे 2 सदस्य निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उभा केल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे आघाडी आणि भाजप हे आपल्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव कशी करतात याबद्दल उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...