आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुछ तो गडबड है:राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीसाठी हालचाली, शिवसेना किंवा राष्ट्रवादी गळाला लावण्याची भाजपची धडपड

औरंगाबाद, मुंबई (मकरंद दंडवते)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मारलेल्या मुसंडीमुळे भाजपपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक धक्का बसला आहे.

हातातोंडाशी आलेला महाराष्ट्रातील सत्तेचा घास गेल्यामुळे अस्वस्थ असलेल्या भाजपने आता शिवसेना किंवा राष्ट्रवादी यापैकी एका पक्षाला गळाला लावण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे दिल्लीत देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी या भाजप नेत्यांशी गुफ्तगू तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड चर्चा या घडामाेडींमुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच सत्तापालट किंवा मध्यावधीचा बार उडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.

भाजप आणि विशेषत: देवेंद्र फडणवीसांना विरोध या एकाच मुद्द्यावर वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेेवर आले होते. मात्र तिन्ही पक्षांची ध्येयधोरणे एकसारखी नसल्याने किमान समान मुद्द्यांवर सरकार हाकताना तिन्ही पक्षांची दमछाक हाेत अाहे. म्हणूनच हे तीन चाकांचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी शक्यता विराेधकांबराेबरच सत्ताधारी पक्षांचे नेतेही खासगीत वर्तवतात.

कामे होत नसल्याने धुसफूस वाढली
आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. मंत्री- नेते आणि कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. पुरेसा निधी मिळत नसल्याने काँग्रेसचे मंत्रीही नाराज आहेत. खात्याचे बजेट १२ हजार कोटी असूनही वर्षभरात के‌वळ ३० टक्के निधी मिळाला मग कामे कशी करणार आणि लोकांना काय सांगणार अशी खंत एका मंत्र्याने बोलून दाखवली होती.यामुळेच हे सरकार अंर्तविरोधाने पडेल असा दावा भाजप नेते वारंवार करतात, असे सांगितले जाते.

मुंबईसाठी युतीत तडजाेड : पुढील वर्षीची मुंबई महापालिका निवडणूक हा राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू होऊ शकतो. भाजपला कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबईची सत्ता काबीज करायची आहे, तर मुंबईची सत्ता टिकवणे हेच शिवसेनेचे सध्याचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा तितका प्रभाव नाही. त्यामुळे मुंबईच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपत तडजोड होऊ शकते,असे सांगितले जाते.

कृषी कायद्यांबाबत नमते धोरण
खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत जाऊन शेतकरी नेत्यांची भेट घेतली, तरीही कृषी कायद्यांबाबत शिवसेनेची भूमिका तळ्यात-मळ्यातच राहिली आहे. मुंबईतील शेतकऱ्यांच्या सभेत शिवसेनेचा एकही मंत्री अथवा नेता उपस्थित राहिला नव्हता.

उद्धव ठाकरे-सुधीर मुनगंटीवार चर्चा
“शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही. आता पुढे बघू,’ असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केले होते. त्यापाठोपाठ भाजपने याआधीच सर्व जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे द्यायला हवी होती. ही वेळ आली नसती, असे सूचक विधान शिवसेनेचे कोकणातील नेते उदय सामंत यांनी केले आहे.

गडकरी-जयंत पाटील-फडणवीस बैठक
गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या तिघांची बैठक झाली. बैठकीत सिंचन प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मात्र या बैठकीवर राष्ट्रवादी अथवा भाजप गोटातूनही फारसे भाष्य झाले नाही. त्यापूर्वी, पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती हे उल्लेखनीय.

राष्ट्रवादीसोबत जवळिकीची संधी
कृषी कायद्यांवर निर्माण झालेला तिढा सोडवण्यास शरद पवारांनी मध्यस्थी करावी, असे आता भाजप गोटातून सुचवण्यात येत आहे. पवारांनी मध्यस्थी करून हा तोडगा संपुष्टात आणल्यास भाजप-राष्ट्रवादीची जवळीक होऊ शकते.

शिवसेनेचे वाढते प्रस्थ
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मारलेल्या मुसंडीमुळे भाजपपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक धक्का बसला आहे. शिवाय कोरोनाकाळात सातत्याने जनतेसोबत संवाद साधणाऱ्या उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा लाेकांवर प्रभाव टाकणारी ठरली अाहे. त्यामुळे सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नव्हे तर शिवसेनेचे प्रभुत्व दिवसेंदिवस सिद्ध हाेत अाहे. आगामी काळात मुंबईसोबतच औरंगाबाद, नवी मुंबईसह पाच मनपा निवडणुका होणार आहेत. विशेषत: मुंबई, औरंगाबादची निवडणूक शिवसेनेसाठी अधिक महत्त्वाची आहे. ठाकरेंच्या या प्रतिमेचा शिवसेनेला फायदा हाेऊ शकताे. त्यामुळे राष्ट्रवादी काळजीत अाहे.

आघाडी सरकारमधील कळीचे मुद्दे

  • औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर
  • मुंबई पालिका निवडणूक
  • राज्यपाल नियुक्त आमदारांचे भिजत घोंगडे
  • मराठा आरक्षणावर तापलेले वातावरण
  • तिजोरीत खडखडाटामुळे खोळंबलेली कामे
बातम्या आणखी आहेत...