आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनावरून नवनीत राणा चर्चेत:डोक्यावर घेतली बाप्पाची मूर्ती अन् उंचीवरून खाली फेकली; हेच का तुमचे हिंदुत्व, सेनेचा सवाल

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांच्या मनोभावे पूजा केल्यानंतर गणेश भक्तांनी शुक्रवारी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर, नेतेमंडळींनीही मोठ्या थाटात गणेश विसर्जन केले. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या गणपती विसर्जनावरून चांगल्याच चर्चेत आहेत. राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीचा उत्साह असताना नवनीत राणा यांनीही बाप्पाचे विसर्जन केले. परंतु, साधारणतः गणपती विसर्जन करताना मूर्ती पाण्यात दोन ते तीन वेळा पाण्यात वरखाली केली जाते.

नवनीत राणा यांनी आधी बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेतली व नंतर ही गणेश मूर्ती काही उंचीवरून खाली फेकली. यादरम्यानचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी नवनीत राणांवर टीकेची झोड उठवली आहे. तर, विरोधकांनीही राणा दाम्पत्यावर टीकास्त्र डागले आहे. हेच का तुमचे हिंदुत्व, असा सवालही शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. यामुळे राणा दाम्पत्य आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पोलिसांसोबत हुज्जत

नुकतेच नवनीत राणा यांनी अमरावतीच्या एका पोलिस ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घातल्याची घटना समोर आली. त्यानंतर तेथील पोलिस कुटुंबियांनी राणा यांचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. लव्ह जिहादच्या एका प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पोलिस ठाण्यात नेहमीच्या आक्रमक शैलीत प्रचंड वाद घातला. मात्र, नवनीत राणा यांनी प्रचंड आरडाओरडा केल्यामुळे या पोलिस ठाण्यातील अधिकारीही चांगलेच आक्रमक होताना दिसले. अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात प्रकार घडला.

हनुमान चालिसावरून आक्रमक

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नवनीत राणा यांच्या अडचणीत भर पडत आहे. हनुमान चालिसा वाचण्यावरुन आक्रमक झालेल्या नवनीत राणा यांना एका मुलाखतीत हनुमानाचा अर्थ विचारला असता त्यांना सांगता आला नव्हता. यावरुनही त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. तर, नुकतेच अमरावतीतून एक मुलगी बेपत्ता झाल्याने याचा संबंध लव्ह जिहादशी खासदार नवनीत राणा यांनी जोडला होता. परंतु, मुलीने माध्यमांसमोर येत नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे, असा खुलासा केला होता.

बातम्या आणखी आहेत...