आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये दादरचा एक फ्लॅट आणि अलिबागमधील 8 प्लॉट्सचा समावेश आहे. ईडीकडून ही मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता.
...तर मीच माझी संपत्ती भाजपला दान करेन -राऊत
माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही काय प्रॉपर्टीवाले आहोत का. 2009 साली आम्ही कष्टाच्या पैशाने जमीन घेतली. त्यावेळी कुणी काही चौकशी केली नाही. आता म्हणे, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 2009 मध्ये घेतलेली ती प्रॉपर्टी एक एकर सुद्धा नाही. आमच्या नातेवाईकांनी स्वतःच्या कमाईने घेतलेल्या त्या जागा आहेत.
मराठी माणसाचे राहते घर जप्त केले
फ्लॅटबद्दल बोलायचे झाल्यास, माझे एका मराठी माणसाचे राहते घर जप्त करण्यात आले आहे. आता भाजपवाले फटाके फोडत असतील. पण, यातूनच लढण्याची प्रेरणा मिळत असते. या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले आढळले तर मी स्वतः माझी संपत्ती भाजपला दान करेल असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
एवढेच नव्हे, तर संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल असेही राऊत म्हणाले. माझे राहते घर आणि अलिबागमधील प्लॉट ही तुम्हाला माझी संपत्ती वाटत असेल तर हे चुकीचे आहे. मराठी लोकांच्या बाबतीत आणि महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते अख्ख्या महाराष्ट्राची जनता पाहत आहे. तुमचा बाप जरी खाली आला तर त्याला सुद्धा घाबरणार नाही. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे. मी कुणालाच घाबरत नाही असेही राऊत पुढे बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी बोलणे झाले अशी माहिती सुद्धा संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राऊतांना अटक करा -नितेश राणे
भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या अटकेची मागणी केली आहे. ईडीने त्यांच्याविरुद्ध PMLA कायद्यांतर्गत कारवाई केली. अर्थातच त्यांनी भ्रष्टाचार झाला. आता त्यांना महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांप्रमाणे तुरुंगात टाकायला हवे अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
ईडीविरुद्ध आरोपांची मालिका
विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी ईडीविरुद्ध आरोपांची मालिकाच लावली होती. यामध्ये चक्क चिकन मटण खरेदी केल्यानंतरही ईडी चौकशी होऊ शकते असे ते म्हणाले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही मला अटक करा असे आव्हान दिले होते. मुंबई पोलिसांकडून विशेष तपास समिती स्थापित करून ईडीवरील आरोपांची मंगळवारीच चौकशी सुरू करण्यात आली. यानंतर मंगळवारीच दुपारी ईडीकडून संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
पत्राचाळ जमीन प्रकरणात 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे कथितरित्या संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. या भूखंडांची किंमत जवळपास 60 लाख रुपये आहे. स्थनिकांना धमकावून कमी पैशात हा भूखंड घेण्यात आला असेही आरोप राऊत यांच्यावर करण्यात आले आहेत.
गोरेगावमध्ये गुरूआशिष कंपनीला पुनर्विकासांचे काम देण्यात आले होते. मात्र संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीने या जागेतील FSI परस्पर विकले होते. असे प्रथमदर्शनीत समोर आले होते. प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हा व्यवहार जवळपास 1 हजार कोटींचा होता. प्रवीण राऊतांवर कारवाई करण्यात आल्यानंतर संजय राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे. हेच प्रकरण गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.