आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 दिवस उलटले:राज्यकारभारात मुहूर्त नडला; 14 मंत्र्यांचा चार्ज पितृपक्षामुळे अडला, केवळ 4 मंत्र्यांनी घेतला पदभार

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटासह भाजपमधील अनेक नेते मंत्रिमंडळ समावेशाकडे डोळे लावून बसले असताना ३४ दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप १८ पैकी १४ मंत्र्यांनी पदभारच स्वीकारलेला नाही, असे आता समोर आले आहे. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाला प्रारंभ झाला असून हा पंधरवडा संपेपर्यंत म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत पदभार स्वीकारायचा नाही, असे शिंदे-फडणवीस सरकारातील मंत्र्यांनी ठरवल्याचे समजते.

१८ पैकी केवळ ४ मंत्र्यांनी पदभार स्वीकारला असून उर्वरित मंत्रिमहोदय पितृपंधरवडा संपण्याची वाट पाहत आहेत. म्हणजेच गेल्या ३४ दिवसांपासून शिंदे-फडणवीस यांच्यासह केवळ ६ मंत्री राज्याच्या कारभाराचा गाडा हाकत आहेत.

पितर (पूर्वज) या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची या दिवसांत पूजा केली जाते. हा (महालय) काळ शुभ मानला जात नाही. सर्वसामान्यपणे या काळात शुभकार्य करीत नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारात १८ मंत्री आहेत. पैकी गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, संजय राठोड आणि दीपक केसरकर या मंत्र्यांनी पितृपंधरवड्यापूर्वी पदभार स्वीकारला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी ३० जून रोजी पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास ९ ऑगस्ट उजाडला. मंत्र्यांना दालनाचे वाटप २४ ऑगस्ट राेजी करण्यात आले. विस्तार होऊन रविवार, ११ सप्टेंबरपर्यंत ३४ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र १८ पैकी केवळ ४ मंत्र्यांनी दालनात बसून अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला आहे. काही मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण सुरु असून काही मंत्र्यांनी वास्तुशास्राप्रमाणे बसण्याची जागा अथवा प्रवेशाची दिशा बदलून हवी आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मात्र दालनात विशेष फेरफार न करता पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी बनवलेल्या खास दालनात बसून कामकाजास प्रारंभ केलेला आहे.

मंत्र्यांऐवजी पीएस, ओएसडी यांची कार्यालयात नियमित हजेरी

मंत्री दालनात बसत नसले तरी पीएस आणि ओएसडी मात्र मंत्री कार्यालयात बसतात. मंत्र्यांनी मात्र त्यांना दिलेल्या शासकीय निवासस्थानातून कारभार हाकणे पसंत केले आहे. आश्चर्य म्हणजे ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी दालनांचे नूतनीकरण केलेले हाेते. आता परत दीड वर्षात नूतनीकरण का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. निविदा न काढता नूतनीकरण हाेत असल्याने ठेकेदार आणि संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांची मात्र चांदी आहे.

09 ऑगस्ट राेजी झाला मंत्रिमंडळ विस्तार

18 मंत्र्यांचा शपथविधी पहिल्या टप्प्यामध्ये 24 ऑगस्टला मंत्र्यांना दालनाचे वाटप 04 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला

दालनाच्या नूतनीकरणाचेही काम रेंगाळले

काही मंत्र्यांकडे पदभार स्वीकारण्याबाबत विचारणा केली असता पितृपंधरवडा हे कारण नसून दालनातील नूतनीकरणाचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आश्चर्य म्हणजे काही मंत्र्यांना दालनाच्या प्रवेशाच्या दिशा तसेच कक्षाचे प्रवेश बदलून हवे आहेत. त्यामुळे दालनाच्या नूतनीकरणाचे काम रेंगाळले असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...