आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटीलिया प्रकरणात खुलासा:स्फोटके ठेवल्याचा मेसेज ज्या मोबाईलमधून पाठवला तो तिहार तुरुंगातून जप्त; इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याकडे होता मोबाईल

मुंबई / नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर स्फोटके ठेवल्याचा मेसेज ज्या फोनमधून करण्यात आला होता तो आता दिल्लीच्या तिहार तुरुंगातून जप्त करण्यात आला आहे. हा मोबाईल तुरुंगातील खोली क्रमांक 8 मध्ये बंद असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरकडे होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

याच फोनच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनल चालवले जात होते. या चॅनलच्या माध्यमातून अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. आता या मोबाईलची न्यायवैद्यक तपासणी होणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

इंग्रजी दैनिक इंडियन एक्सप्रेसने अधिकाऱ्यांचा दाखला देत दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय तपास संस्था NIA ने एका खासगी सायबर एजंसीला फोन ट्रॅक करण्याचे काम सोपवले होते. याच फोनमधून स्फोटकांची जबाबदारी घेणारा मेसेज पाठवण्यात आला होता. त्यांनी खासगी तपास संस्थेची माहिती दिली नाही. पण, त्यांच्याकडून आलेली माहिती दिल्ली पोलिसांना दिली.

सिमकार्डचे लोकेशन तिहार तुरुंग
खासगी सायबर संस्थेने तयार केलेल्य रिपोर्टनुसार, हे टेलिग्राम चॅनल 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता 'टार' नेटवर्कच्या माध्यमातून बनवण्यात आले होते. या नेटवर्कचा वापर डार्क वेब वापरण्यासाठी केला जातो. ज्या मोबाईलमधून हा संपूर्ण प्रकार करण्यात आला त्याच्या सिमकार्डचे लोकेशन तिहार तुरुंग दाखवले होते.

अँटीलिया इमारतीसमोर 24 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने 28 फेब्रुवारी रोजी घेतली होती. पण, दुसऱ्याच दिवशी आणखी एका टेलिग्राम चॅनलने हा दावा फेटाळून लावताना एक पोस्टर जारी केले होते.

स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेणाऱ्या संघटनेने लिहिले होते की "हा तर फक्त ट्रेल आहे, आम्हाला थांबवूनच दाखवा. तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्या देखत दिल्लीत हल्ला केला होता, तुम्ही मोसादशी हात मिळवणी केली तरी काहीच करू शकला नाहीत. तुम्हाला आधीच सांगितले होते, पैसे ट्रांसफर करून टाका बस."

काय आहे प्रकरण?
25 फेब्रुवारी रोजी अँटीलियासमोर स्कॉर्पिओ कार सापडली. ही कार 24 फेब्रुवारीच्याच मध्यरात्री ठेवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या कारमधून जिलेटीनच्या 20 कांड्या जप्त केल्या. या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेनची वेळोवेळी चौकशी करण्यात आली. त्याने आपली कार चोरीला गेल्याची तक्रारही दिली होती. पण, 5 मार्च रोजी त्याचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...