आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
२६/११ ची ती काळरात्र आजही अंगाचा थरकाप उडवते... त्या घटनेला तब्बल एक तप पूर्ण होऊनही आजही तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो.. ती जीवघेणी धावपळ..रक्ताचे थारोळे...डोळ्यांसमोर पावलोपावली मृत्यू दिसत होता... पण तेव्हा एकच लक्ष्य समोर होते... ते म्हणजे अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या निरपराध देशी-विदेशी बांधवांची सहीसलामत सुटका करायची. जो दिसेल त्याच्यावर गोळीबार करत अतिशय नियोजनबद्ध हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना कंठस्नान घालायचं..तास-दोन तास नव्हे, तर तब्बल आठ तास त्या अतिरेक्यांशी लढतानाचा पूर्ण प्रसंगच वाचा तत्कालीन साऊथ झोन पोलिस उपायुक्त व सध्याचे मुंबई सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था प्रमुख) विश्वास नांगरे पाटील यांच्याच शब्दांत...
त्या रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी नियंत्रण कक्ष बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे हॉटेल ताजमध्ये अतिरेकी घुसल्याचा संदेश प्राप्त झाला अन् क्षणाचाही विचार न करता आम्ही त्या दिशेने निघालो. अकराव्या मिनिटाला चार कर्मचाऱ्यांसोबत हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर मी पोहोचलो. काही कळण्यापूर्वीच सोबतचा कर्मचारी अमित खेतले याला दोन गोळ्या लागल्या व तो धारातीर्थी पडला. हल्लेखोर एकाच मजल्यावर असल्याचे लक्षात घेऊन तातडीने व्यूहरचना आखली. दुसऱ्या मजल्यावर १३ व्या मिनिटाला अतिरेक्यांशी धुमश्चक्री झाली. माझ्या पिस्तुलातील ४ फैरींना विरुद्ध बाजूने एके-४७ च्या ३० फैरींनी प्रत्युत्तर मिळाले. त्या वेळी ताजच आपली समाधी असेल की काय अशी शंका मनाला चाटून गेली. पण समयसूचकता प्रसंगावधान राखून चढाई केली.
सहावा मजला गाठला विसाव्या मिनिटाला. आम्ही केलेल्या अनपेक्षित गोळीबारामुळे जवळजवळ एका तासात अतिरेक्यांनी एकही गोळी झाडली नाही. त्यांना युद्ध जास्त काळ चालवायचं होतं, जगाचं लक्ष वेधायचं होतं. बऱ्याच वेळच्या शांततेत नंतर अचानक दोन ग्रेनेड ब्लास्ट झाले. त्या वेळी अतिरेकी उत्तर बाजूच्या सहाव्या मजल्यावर गेले होते. आतमध्ये मृत्यूचे तांडव सुरू झाले होते...त्या स्थितीत आपल्या आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मरायची पुन्हा एवढी मोठी संधी येणार नाही याची जाणीव माझ्या छोट्या टीमला करून दिली. पुन्हा लिफ्ट पकडली अन् सहावा मजला गाठला. मृत्यूला हुलकावणी देत आगेकूच करत होतो. शेवटी सीसीटीव्ही रूममध्ये पोहोचलो. तिथून त्यांची पोझिशन कळाली. त्यांनी पाच निरपराध नागरिकांना बंदी बनवले होते. या परिस्थितीची नेमकी माहिती वायरलेसवरून तत्कालीन पोलिस आयुक्तांना दिली. त्यांच्याकडून जोपर्यंत नेव्हीचे कमांडो पोहोचत नाहीत तोपर्यंत अतिरेक्यांना तिथेच रोखून धरण्याचे आदेश आले.
दरम्यानच्या काळात अतिरेक्यांनी आमची जागा हेरून आमच्यावर ग्रेनेड हल्ले केले. लाकडी मजला पेटला. येथे जळून मरण्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरू, असा मी निर्णय घेतला आणि आम्ही ‘लाइन फॉर्मेशन’मध्ये बाहेर पडलो. अचानक झालेल्या गोळीबाराने आमची टीम तुटली. सोबतचे अधिकारी राजवर्धन यांच्यासोबत पुढेपर्यंत पोहोचू शकलो. सहकारी अमितला तीन गोळ्या लागल्या. राहुलच्या छातीत गोळ्या गेल्याने तो धारातीर्थी पडला होता. पण ज्या वेळी देशासाठी लढताना मृत्यू साद घालतो त्या वेळी एक स्वर्गीय कारण त्या मृत्यूला जवळ करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहते. आमच्या उरात धग होती ती महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रशिक्षण, शौर्य आणि त्यागभावनेची. त्या बळावर आम्ही तब्बल सहा तास किल्ला लढवला. मग सुदैवाने नेवल कमांडर व त्यांचे साथीदारही मोर्चा सांभाळत साथीला आले. अखेर अतिरेक्यांचा खात्मा झाला.... त्या काळरात्रीला आज बारा वर्षे उलटून गेली असली तरी ती रात्र आठवताना मन अधिकच अस्वस्थ होऊन जाते.
आता एसओपी.. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस : केवळ अतिरेकी हल्लेच नाही तर इतरही वेगवेगळे हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता एसओपी स्थापन केली आहे. दर महिन्याला, आठवड्याला महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षिततेचे ऑडिट केले जाते. इंटेलिजन्सला प्राधान्य देत पोलिस, स्पेशल युनिटशी समन्वय साधून संभाव्य धोके लक्षात घेता उपाययोजना केल्या जात आहेत.
धैर्याने मुकाबला ...
अतिरेक्यांनी हल्ला केल्याचे समजताच मुंबई पोलिस दलातील शिपाई असो की अधिकारी.. प्रत्येकाने हातात जे काही होते जसे कार्बन, थ्री नॉट थ्री बंदुका... अशा शस्त्रांनी मुकाबला केला. आता आपण फोर्स वन, क्यूआरटी या दोन स्वतंत्र प्रशिक्षणयुक्त अत्याधुनिक शस्त्रांसह टीम सज्ज केल्या आहेत. अगोदर एकच बॉम्बशोधक व नाशक पथक होते, आता प्रत्येक झोनला स्वतंत्रपणे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
१०४ किमी समुद्रकिनारा, चोवीस तास गस्त (कोस्टल सुरक्षिततेला प्राधान्य)
कसाबसह अतिरेक्यांनी सूक्ष्म प्लॅनिंग करून हल्ल्याचा कट रचला होता. अतिरेकी समुद्रमार्गे आले. त्यामुळे या हल्ल्यानंतर सर्वप्रथम मुंबई पोलिस, नेव्ही व कोस्ट गार्ड या तिघांचा समन्वय साधून सुमारे १०४ किमीपर्यंत समुद्रातील गस्त वाढवण्यात आली आहे. समुद्राच्या सर्व बाजूला चोवीस तास पेट्रोलिंग सुरू असते. तसेच मच्छीमार संघटनांशी समन्वय साधून, त्यांना ओळखपत्र देऊन त्याची नियमित तपासणी होते.
१२ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
अतिरेकी हल्ल्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये सद्यःस्थितीत साडेसहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ साडेपाच हजार कॅमेऱ्यांचे जाळे विणले जात आहे.
बुलेटप्रूफ वाहने व जॅकेट
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी २४ तास गस्त घालताना बुलेटप्रूफ जॅकेट व वाहने साथीला असतात. पोलिसांना अधिक सक्षम केले जात असून त्यात अत्याधुनिक उपकरणांवर भर आहे.
प्रधान आयोगाकडून प्रशंसा..
सेवानिवृत्त केंद्रीय गृहसचिव राम प्रधान व रॉ अधिकारी असलेले बालचंद्रन यांनी २६/११ च्या घटनेची चौकशी करून शासनाला प्रधान आयोगाचा अहवाल सादर केला. त्यामध्ये माझ्या व माझ्या टीमने बजावलेल्या कामगिरीची प्रशंसा केली.
शब्दांकन : नीलेश अमृतकर, नाशिक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.