आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:दरेकरांच्या हातून निसटली मुंबै बँक; पवार, आदित्य यांची रणनीती सफल, वर्षानंतर सेनेकडे अध्यक्षपद

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी व शिवसेना युतीचा बँकेवर फडकला झेंडा

मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये गुरुवारी (ता.१३) महाविकास आघाडीने सरशी साधली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झाला. त्यामुळे मुंबै बँकेवरील भाजपचे पर्यायाने प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व कमी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थात पर्यायाने महाविकास आघाडीच्या वर्चस्वाखाली ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आली आहे. नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत पराभूत झाल्याने बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीने या निवडणुकीत मात्र बाजी मारून कसर भरून काढली आहे.

बँक अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युती करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची गुरुवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या वेळी बँकेतील प्रतिनिधीदेखील होते. या बैठकीमध्ये युतीची घोषणा करण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित मिळून ११ जागा झाल्या, तर भाजपकडे अवघ्या ९ जागा शिल्लक राहिल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली, तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली. माजी अध्यक्ष व भाजप नेते प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असता तर मोठी नाचक्की झाली असती. बहुमत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक दरेकरांनी लढवली नाही.

दरेकरांचे सदस्यपद झाले रद्द :मजूर विभागातून दरेकर निवडून आले होते, मात्र ते मजूर नसल्याने त्यांचे सदस्यत्व सहकार विभागाने रद्द केले आहे. मात्र बँक प्रतिनिधी म्हणून दरेकर सध्या बँकेचे सदस्य कायम आहेत. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत.

ईश्वर चिठ्ठीत भाजपला उपाध्यक्षपद : उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचे ठरले. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली. सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुंबै बँकेचे अध्यक्षपद हे एक वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी सरकारचा दबाव : दरेकर
या निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, “भाजपकडे १० मते होती. विष्णू भुंबरे हे फुटले. त्यामुळे महाविकास आघाडीला ११ मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली.

बातम्या आणखी आहेत...