आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांना शिवसेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या आश्रय घरकुल योजनेतील कथित अनियमिततेची चौकशी करण्यास सांगितले आहे. या संपूर्ण प्रकल्पात १ हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करून भाजपने कोश्यारी यांच्याकडे गेल्या महिन्यात तक्रार दाखल केली होती.
‘तुमची तक्रार योग्य कारवाईसाठी लोकायुक्तांकडे पाठवण्यात आली आहे,’ असे कोश्यारींचे प्रधान सचिव संतोषकुमार यांच्याकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नगरसेवक विनोद मिश्रा व भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असून राज्यपालांनीही आता त्यात उडी घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारला नमते घेण्यास भाग पाडल्यानंतर राज्यपालांनी थेट पालिकेतील गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश देऊन शिवसेनेला चांगलाच झटका दिला आहे.
सन २०१२ च्या पालिका निवडणुकीपूर्वी या महत्त्वाकांक्षी योजनेची घाेषणा करण्यात आली होती. ती पूर्ण झाली नाही. नंतर २०१७ च्या निवडणुकीत या योजनेचे वचन दिले गेले. आता २०२२ च्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे सदर योजना मार्गी लावण्याचे काम पालिकेतील सत्ताधारी शिवसेना करत आहे, असा भाजपचा आरोप आहे.
काम ६७८ कोटींचे, कंत्राट १,८४४ कोटींचे
शिवसेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची आश्रय योजना बनवली होती. त्याच्या निविदांमध्ये पालिकेस केवळ एकच बोली मिळाली. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तीन बोली मिळाल्याशिवाय ती देता येत नाही. पालिकेने निविदा पुन्हा मागवायला हव्या होत्या. तिन्ही प्रस्तावांसाठी बीएमसीचा स्वतःचा अंदाज ६७८ कोटी होता, परंतु कंत्राटदारांना मात्र १ हजार ८४४ कोटी रुपयांचे काम दिले.
सेना-भाजप संघर्ष विकोपाला
१. मुंबई पालिकेत २५ वर्षे मित्र असलेली शिवसेना - भाजप यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. पालिकेच्या फेब्रुवारीत निवडणुका असून शिवसेना प्रथमच युतीबाहेर पालिका निवडणूक लढवत आहे.
२. २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९४, तर भाजपचे ८४ नगरसेवक आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत काट्याची टक्कर आहे. सुरक्षितता म्हणून राज्यात सत्तेत असल्याने शिवसेनेने मुंबई पालिकेतील नगरसेवक संख्या २३६ केली आहे.
३. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चाैरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफी जाहीर केली आहे. याचा सेनेला पालिका निवडणुकीत मोठा लाभ होणार आहे.
योजना १४ हजार घरांची, आली १२ हजार घरांवर
पालिकेने १४ हजार ११० घरे बांधण्याची योजना आखली होती, पण आता आश्रय योजनेत ३०० आणि ६०० चौरस फुटांच्या ३४ ठिकाणी १२ हजार ८९८ सदनिका बांधल्या जाणार आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
परिवहन विभागातील पदोन्नतीचीही चौकशी
याआधीही राज्यपालांनी भाजप आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.