आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलिस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे.
22 लोकांचा मृत्यू
मुंबईमध्ये सलग होत असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशीरा झालेल्या भूस्खलनच्या घटनांमध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. 17 लोकांनी चेंबूर परिसरात आणि 5 जणांनी विक्रोळी येथे जीव गमावला. चेंबूर अपघतात 16 लोकांना वाचवण्यात आले. येथे पाच घरे कोसळली. NDRF ची टीम ढिगारा हटवत आहे.
मुख्यमंत्र्यांचे पालिकांना निर्देश
मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाऊस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे. कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे.
पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्याठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत, वाहतुकीवर परिणाम झालेला आहे मात्र लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.
उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक
मुंबईतील चेंबुर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई शहर व राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालिन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांनीही सुरक्षितताविषयक नियम व संदेशांचे पालन करुन काळजी घ्यावी. आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिस किंवा नजिकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.