आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट :धारावी पॅटर्नचे यश; रुग्ण दुपटीचे प्रमाण 20 दिवसांवर

मुंबई (अशाेक अडसूळ)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्क्रीनिंग, विषाणूचा पाठलाग, घरपोच जेवण, स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण, संस्थात्मक विलगीकरण ही पंचसूत्री

आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी व काेरोनाचा हाॅटस्पाॅट धारावीतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३ वरून २० दिवसांवर आला आहे. काँटॅक्ट ट्रेसिंग, स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण, स्क्रीनिंग, घरपोच अन्न आणि संस्थात्मक विलगीकरण या पंचसूत्रीने धारावीत कोराेनाचा आलेख वाकवण्यात बृहन्मुंबई महापालिकेला यश मिळाले आहे.

मुंबईच्या हृदयस्थानी ७ लाख लोकसंख्येची धारावी उभी आहे. १ एप्रिलला पहिला रुग्ण आढळला अन् बघता बघता धारावी हाॅटस्पाॅट झाली. १५ दिवसांत ६० रुग्ण झाले, पैकी ११ मृत्यू झाले. रुग्ण दुपटीचा वेग ३ दिवस झाला. केंद्रीय पथकाने धारावीला भेट दिली. त्यानंतर प्रशासन जागे झाले. पालिकेने ‘मिशन धारावी’ हाती घेतले.

मुंबईचा डबलिंग रेट १६ असताना धारावीचा ३ वरून २० दिवसांवर आणला

> चाचणी अहवालाचा कालावधी २४ तासांवर आणला. ६ खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. काँटॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण १५ वर नेले. आयुक्त धारावीत ३- ३ किमी फिरले. पालिका प्रशासनाच्या २ महिन्यांच्या प्रयत्नांना मेअखेरीस यश आले. रुग्ण दुपटीचा कालावधी २० दिवस झाला. त्या वेळी मुंबईचा डबलिंग रेट १६ होता, तर राज्याचा १७.५ दिवस होता.

३.६० लाख (५०%) नागरिकांचे स्क्रीनिंग

धारावीत २४०० हेल्थकेअर वर्कर नेमले. फीव्हर कॅम्प लावले. १ लाख २१ हजार ज्येष्ठांचे सर्वेक्षण करून २ हजार जोखमीच्या व्यक्ती शोधल्या. ६०० संशयितांच्या चाचण्या केल्या. ४७,५०० अतिजोखमीच्या व्यक्तींचे स्क्रीनिंग केले. यात २४ खासगी डाॅक्टरांनी मदत केली. एकूण ३ लाख ६० हजार (५०%) नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले.

> केस ब्रेकडाऊन : मुंबईच्या २४ वाॅर्डांपैकी सर्वाधिक ३१२७ रुग्ण धारावीतच आहेत. पण सर्वाधिक १८८३ रुग्णांना डिस्चार्ज देऊन पाॅझिटिव्ह केस ब्रेकडाऊन करण्यात धारावीनेच (जी/एन वाॅर्ड) बाजी मारली आहे.


एका रुग्णामागे ६ काँटॅक्ट ट्रेसिंग

स्वच्छतागृह नसलेल्या ७९९२ लोकांना क्वॉरंटाइन केले. रुग्णामागे काँटॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण ६ केले. १३ हाॅटस्पाॅट प्रतिबंधित केले. १९ हजार लोकांना रोज दोन वेळचे जेवण व २९ हजार कुटुंबांना घरपोच धान्याची सोय केली. ४५० सार्वजनिक स्वच्छतागृहे दिवसातून दोन वेळा निर्जंतुक होऊ लागली.

पॅटर्नचे शिल्पकार

> इक्बालसिंह चहल: (आयुक्त, बृहन्मुंबई मनपा) ‘चेस द ट्रेसिंग’ने कोरोनाची साखळी तोडली.

> सुरेश काकाणी : (अति.आयुक्त) सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या निर्जंतुक केल्याने संसर्ग थांबला.

> किरण दिघावकर (सहायक आयुक्त, धारावी) अॅग्रेसिव्ह स्क्रीनिंग, अधिक चाचण्या, घरपोच अन्न पोहोचवणे हे धारावीत गेम चेंजर ठरले.

आरोप : चाचण्या घटवल्या तीव्र लक्षणांच्या रुग्णांचीच चाचणी करण्याच्या पालिकेच्या भूमिकेमुळे रुग्णसंख्या घटल्याचा भास होतो, असा आरोप धारावी फाउंडेशनचे अॅड. राजू कोरडे यांनी केला आहे.

0