आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुग्ण रुग्णालयात येण्याची वाट पाहण्यापेक्षा नागरिकांच्या दारी जाऊन रुग्ण शोधत त्यावर तात्काळ उपचार करण्यास प्राधान्य हेच मुंबईच्या कोरोना नियंत्रण पॅटर्नचे गमक आहे. प्रारंभी संपूर्ण देशात “हॉटस्पॉट' असणारे मुंबई शहर कोरोना नियंत्रणातील अचूक आणि सूक्ष्म नियोजनाच्या बळावर आता झपाट्याने 'रिकव्हर' होत आहे. पालिकेने विभाग स्तरावर स्थापलेले नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रूम) सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून या वॉर्ड वॉर रूम्सद्वारे दिवसाला तब्बल १० हजार रुग्ण व संशयित रुग्ण हाताळण्याचे यशस्वी नियोजन होते आहे.
दिल्लीसह अन्य शहरांनीही याबाबत मुंबईचा आदर्श घ्यावा, अशा आशयाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केल्याने मुंबई पालिकेचा हा पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सुरुवातीला मुंबईची रुग्णसंख्या वाढू लागली होती. १० फेब्रुवारीच्या सुमारास शहरातील बाधितांची एकूण संख्या ३ लाख १३ हजार होती. त्यानंतरच्या ७६ दिवसांत ही संख्या ६ लाख २२ हजारांवर रोखली गेली. मृत्यूच्या संख्येची तुलना केली तर १० फेब्रुवारीला एकूण मृत्यू ११ हजार ४०० होते. तर २५ एप्रिल रोजी हाच आकडा १२ हजार ७१९ इतका होता. या काळात १ हजार ३१९ रुग्ण दगावले. म्हणजे फेब्रुवारी नंतरच्या दुसऱ्या लाटेतील ३ लाख ९ हजार बाधितांच्या तुलनेत विचार केला तर मृत्यू दर ०.०४ टक्के आहे.
जगातील हा सर्वात कमी मृत्यू दर आहे, हे विशेष. रुग्णवाढीचा दर बऱ्यापैकी रोखण्यात आणि मृत्यूदर अत्यल्प राखण्यात आलेल्या या यशामागे मुंबई पालिका व अन्य स्थानिक यंत्रणांच्या कामाचा मोठा वाटा आहे. त्याशिवाय मुंबईत कोविड जंबो सेंटर्सच्या माध्यमातून ९००० खाटा उभारून त्यातील तब्बल ६० टक्के खाटांना प्राणवायूची जोडणी करण्यात आली. शहरातील सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली. सध्या ३५ मोठी रुग्णालये व १०० लहान रुग्णालयांतील ८० टक्के खाटांवर पालिकेचे नियंत्रण आहे. त्यांना आरोग्य सेवेचे दर नेमून दिले आहेत. रुग्णालयांनी दिलेल्या बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने लेखा परीक्षक नेमले आहेत. सर्व खाटांचे नियोजन वॉर्ड वॉर रूम मधूनच होते. गेल्या वर्षी जून पासून ते आतापर्यंत ६ लाख रुग्णांची व्यवस्था या माध्यमातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये दिवसाला जवळपास ४०-५० हजार चाचण्या होतात त्यापैकी ३०-३५ हजार चाचण्या आर.टी.पी.सी.आर. असतात. या चाचण्या अधिक खात्रीशीर मानल्या जातात. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईतील रुग्णसंख्या अटोक्यात राहू शकली.
सजगता आणि नियोजनावर भर
सुरुवातीपासून आम्ही सजग होतो आणि कामात सातत्य राखण्यावर भर दिला. कोणत्याही रुग्णलयात औषधांचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा आम्ही कमी पडू दिला नाही. काही जणांनी सुरुवातीला पालिकेला ऑक्सिजन प्लँट उभारण्याची गरज काय, असे म्हणत आमच्यावर टीकाही केली. पण, त्याच ऑक्सिजनने आज रुग्णांचे प्राण वाचवले. सर्वोच्च न्यायालय जेव्हा सांगते की, मुंबई महापालिकेचा आदर्श घ्या, यामध्ये सगळे येते. - किशोरी पेडणेकर, महापौर
धारावीसह झोपडपट्ट्या केंद्रस्थानी
या शहरात धारावीसह मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत, दादर व माहीमसारखे गर्दीचे भागही आहेत. गेले वर्षभर झोपडपट्ट्या केंद्रस्थानी ठेवत पालिकेच्या यंत्रणेने काम केले. रुग्णसंख्या कमी करणे आव्हानच होते. सध्या धारावीत केवळ ८६६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या ठिकाणी संशयित रुग्णांच्या शोधासाठी व्यापक मोहीम, संस्थात्मक अलगीकरण, घरोघरी जाऊन, फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या, पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा या चौफेर उपाययोजनांमुळे हे शक्य झाले. - किरण दिघावकर, सहायक आयुक्त, महापालिका
पारदर्शकता महत्त्वाची
मुंबई महानगर पालिकेचे कार्य अत्यंत उत्कृष्ट आहे. विशेष म्हणजे सर्व बाबतीत पारदर्शकता आहे. सगळी आकडेवारी लोकांसमोर रोज दिली जाते. कुठलीही माहिती लपविली जात नाही. आरोग्य व्यवस्थापन व्यवस्थित आहे. संवादाचा कुठेही अभाव नाही. मार्गदर्शक सूचनांचे पालन व्यवस्थित होत आहे. कुठलीही नवी उपचारपद्धती विकसित झाली की लगोलग त्याचा अंतर्भाव केला जातो. -डॉ. राहूल पंडित, सदस्य, राज्य कोरोना विशेष कृती दल
प्राणवायू पुरवठा व लसीकरण
रुग्णांना पूर्वी प्राणवायू सिलेंडरव्दरा पोहचविला जात होता. त्यात वेळ आणि प्राणवायूचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होत असे. हे लक्षात घेता महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांत १३ ते २६ हजार लिटर क्षमता असलेले प्राणवायूचे टॅंक बसविण्यात आले. मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे लसीकरणात मुंबई अग्रेसर आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी मिशन झिरो राबविण्यात आले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत ३५ लाख १० हजार घरांना आरोग्यसेविका आणि आरोग्यदूतांनी भेटी दिल्या. त्यांनी गोळा केलेल्या माहितीतून सहव्याधी असलेल्या ५१ हजार लोकांना शोधण्यात यश आले. मास्क न लावणाऱ्यां २७ लाख नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांना मास्कही दिले. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात रहाण्यास मदत झाली.
रुग्णांपर्यंत पोहचण्याला प्राधान्य
संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात घेऊन आम्ही गर्दीच्या ठिकाणी, बाजारात, गल्लो-गल्लीत, रेल्वे आणि बस स्थानके, वस्त्यांमध्ये जाऊन रुग्ण शोधून काढण्याचे व त्यांच्यावर तात्काळ उपचाराचे जे काम केले. रेमेडीसीवरचा तुटवडा होता त्यावेळी पालिकेच्या सर्व रुग्णालयांत ते उपलब्ध होते. आम्ही डॉक्टरांना ट्रेनिंग, उपचार पद्धतीतील बदलांची माहिती दिली. प्रत्येक गोष्टीचे काटेकोर नियोजन केले. अडचणींवर तात्काळ उपाय शोधून यंत्रणा गतिमान केली. -सुरेश काकाणी,अतिरिक्त आयुक्त, महापालिका
असा आहे मुंबई पॅटर्न
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.