आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 60 दिवसात सर्वांच्या लसीकरणाची तयारी:BMC ने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले, एक कोटी लसी आयात करण्याचा निर्णय

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकार 5 कोटी लस डोस खरेदी करणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाची गती वाढवण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. 'स्पुतनिक V'ला उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तीन वितरक कंपन्यांनी 1 कोटी लस देण्यासाठी निविदा दाखल केल्या आहेत. या जागतिक निविदामध्ये फायझर आणि मॉडर्ना सारख्या जागतिक दर्जाच्या लस उत्पादकांचा देखील समावेश असू शकतो.

लस आयात करण्यासाठी 7 अब्ज खर्च येईल
महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी बुधवारी एका मुलाखतीत सांगितले की, मुंबई देशातील पहिले असे शहर आहे जे स्वतंत्रपणे लसींची आयात करणार आहे. लस आयात करण्यासाठी बीएमसी सुमारे 7 अब्ज रुपये (96 मिलियन डॉलर) खर्च करेल.

मुंबईत लसीकरण 60 दिवसात पूर्ण होऊ शकते
चहल यांनी सांगितले की जर त्यांच्याजवळ दीड कोटी डोस असतील तर 60 दिवसांमध्ये मुंबईतील सर्व लोकांना कोरोना लस दिली जाऊ शकेल. जलद लसीकरणामुळे कोरोनाव्हायरसची तिसरी लाट टाळण्यास मदत होऊ शकते.

18-44 वर्षांच्या लोकांसाठी हवे आहेत 1 कोटी डोस
आतापर्यंत लंडनस्थित तालिसिन इंटरनेशनल लिमिटेड आणि हैदराबादस्थित दोन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. तिन्ही कंपन्या स्पुतनिकचे अधिकृत वितरक आहेत. चहल यांनी सांगितले की, मुंबईत 18-45 वयोगटातील 50 लाखाहून अधिक लोक राहत आहेत, यांच्यासाठी एक कोटी डोस आवश्यक आहेत.

या निविदा प्रक्रियेत बऱ्याच मोठ्या कंपन्या असू शकतात
निविदा भरण्याची शेवटची तारीख आधी 18 मे होती, ती 25 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निविदा केवळ स्पुतनिकच नव्हे तर इतर अनेक जागतिक लस उत्पादकांसाठीदेखील काढण्यात आल्या आहेत. यात फाइजर, जॉनसन आणि जॉन्सन, सीरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना या जागतिक दर्जाच्या लस उत्पादकांचा देखील समावेश असेल.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत आहे
मुंबईत कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये सतत घट होत आहे. एका महिन्यापूर्वी, येथे पॉझिटिव्हिटी रेट 31% होता, जो आता कमी होऊन 5% वर आला आहे. मे महिन्याच्या अखेरीस हा दर 2 टक्क्यांवर जाईल असा दावा चहल यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकार 5 कोटी लस डोस खरेदी करणार
मुंबईप्रमाणेच महाराष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय बाजारातून 5 कोटी लस डोस खरेदी करेल. राज्य सरकारनेही पुढील 8 दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्राने लस आयात करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्याने निविदा काढल्या आहेत. निविदेत काही माहिती मागवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, लसी उत्पादक लसीचे किती डोस देणार. ही लस किती दिवसात उपलब्ध होईल आणि याची किंमत किती असेल.

ठाणे आणि नवी मुंबईनेही निविदा काढल्या
मुंबईप्रमाणेच ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेनेही लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. ठाणे महानगरपालिका लवकरच पाच लाख कोरोना लस खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तर नवी मुंबई महानगरपालिकेला चार लाख कोरोना डोस खरेदी करायचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...