आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमानुष वागणूक:मुलांना जमिनीवर फेकले, मारहाण केली; मुंबईतील पूर्व प्राथमिक शाळेतील दोन शिक्षिकांवर गुन्हा, घटना CCTVत कैद

कांदिवली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या कांदिवली येथील प्री-स्कूल या शाळेत शिक्षकांचा अमानुष चेहरा समोर आला आहे. शाळेतील लहान मुलांना दोन शिक्षिका शिवीगाळ, मारहाण एवढेच नव्हे तर त्यांना उचलून जमिनीवर फेकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी दोन शिक्षिकांवर गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिका मुलांचा छळ करत असतानाची घटना शाळेच्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या व्यवस्थापनानेच हे सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहे.

अशी उघडकीस आली घटना

याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी माहिती दिली की, हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा एका पालकाला त्यांच्या मुलाच्या वागण्यात अचानक आक्रमक बदल दिसून आला. मुलाच्या स्वभावात अचानक आक्रमकपणा व इतर बदल जाणवल्याने या चिंतीत पालकाने इतर पालकांशी संपर्क केला व याच प्री-स्कूलमध्ये शिकत असलेल्या मुलांच्या वागणुकीत काही बदल झाला का?, असे विचारले. धक्कादायक म्हणजे सर्वच पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये अचानक आक्रमकता दिसून येत असल्याचे सांगितले.

शाळेच्या व्यवस्थापनालाही बसला धक्का

त्यामुळे या सर्व पालकांनी मिळून 27 मार्च रोजी प्री-स्कूलच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. व्यवस्थापनानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले. शाळेच्या बाहेर व आत असणाऱ्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व्यवस्थापनाने तपासले. तेव्हा त्यांना शाळेतील दोन शिक्षिका या मुलाशी गैरवर्तन करताना आढळून आले. शिक्षकांचे मुलांसोबतची वागणूक पाहून व्यवस्थापनातील सदस्यांनाही धक्का बसला. व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सर्व पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्राथमिक शाळेत 25 मुले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय-काय दिसले?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही शिक्षिका मुलांना मारताना, त्यांना जमिनीवर फेकताना, त्यांच्या गालांना चिमटे घेताना, ते ओढताना आणि मुलांच्या डोक्यावर पुस्तक मारताना दिसत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शिक्षिकांना घाबरून मुले गप्प बसायची. कांदिवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर जाधव यांनी सांगितले की, 'आम्ही दोन्ही शिक्षकांवर बाल न्याय कायदा 2000 च्या कलम 23 नुसार (अल्पवयीन किंवा मुलासाठी क्रूरतेसाठी शिक्षा) गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही."

हेही वाचा,

लाथा-बुक्क्यांनी तुडवले VIDEO:दिवा स्टेशनवर 2 प्रवाशांना बेदम मारहाण, लोकलमध्ये गेटवरच उभे राहिल्याने प्लॅटफॉर्मवरील प्रवासी संतापले

मुंबई परिसरात लोकलमध्ये होणारी गर्दी व त्यातून होणारे वाद नवीन नाही. दिवा स्टेशनमध्येही अशाच एका वादातून दोन प्रवाशांना इतर प्रवाशांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेनच्या गेटवर उभे राहून दोन प्रवासी चढण्यात आणि उतरण्यात अडथळे निर्माण करत होते. दिवा स्टेशनमध्ये काही प्रवाशांना यामुळे लोकलमध्ये चढता येत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला बाचाबाची झाली व त्यानंतर स्टेशनवर असलेल्या संतप्त प्रवाशांनी लोकलच्या गेटवर उभे असलेल्या दोघांना खाली खेचले व त्यांना बेदम मारहाण केली. प्रवाशांनी अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी या दोन प्रवाशांना तुडवले. ही संपूर्ण घटना सोमवारी घडल्याचा दावा केला जात आहे. वाचा सविस्तर