आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही दिवस बाहेरुन डबा:मुंबईचे डबेवाले 3 ते 8 एप्रिलपर्यंत रजेवर, धार्मिक यात्रांसाठी गावी जाणार; लाखो नोकरदारांची होणार गैरसोय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या अचूक मॅनेजमेंटमुळे लाखो चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले सहा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. मुंबई डबेवाला असोसिएशनने ही माहिती दिली असून दिलगिरीही व्यक्त केली आहे. मुंबईत येत्या 3 ते 8 एप्रिल या कालावधीत डबेवाल्यांची सेवा बंद असणार आहे. त्यामुळे चाकरमानी मुंबईकरांना आता 4-5 दिवस घरुन किंवा इतर ठिकाणाहून आपल्या पोटाची सोय करावी लागणार आहे.

गावांमध्ये धार्मिक यात्रेत सहभागी होणार

अत्यंत प्रामाणिक, कडक शिस्तीचे व धार्मिक माणसे म्हणून डबेवाल्यांची ओळख आहे. मुंबईत डबेवाले म्हणून काम करणारे बहुतेक जण हे राज्यातील वेगवेगळ्या विशेषत: ग्रामीण ठिकाणांहून याठिकाणी येतात. बहुतांश डबेवाले हे मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला आणि संगमनेर या गावांमधील आहेत. सध्या या गावांमधील कुलदैवतांच्या यात्रा सुरू आहेत. या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले आपापल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे येत्या 3 ते 8 एप्रिल या कालावधीत डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.

2 दिवसांच्या सुट्ट्यामुळे काहीसा दिलासा

मुंबई डबेवाल्यांनी आपण 3 ते 8 एप्रिलदरम्यान रजेवर जाणार असल्याचे सांगितले असले तरी डबेवाल्यांची प्रत्यक्षात सुटी केवळ चारच दिवस असणार आहे. 3 ते 8 एप्रिलदरम्यान महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या सरकारी सुट्या येत आहे. हे दोन दिवस चाकरमान्यांनाही सुट्ट्या असल्यामुळे दोन दिवस तरी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. 9 एप्रिलपासून डबेवाले पुन्हा नेहमीप्रमाणे कामावर हजर राहून डबे पोहोचविण्याचे काम करतील, असे डबेवाल्यांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनने व्यक्त केली दिलगिरी

नोकरीसाठी मुंबईतील बहुतांश जण भल्या पहाटेच घराबाहेर पडतात. तसेच, अनेक जण बाहेरुन येऊन मुंबईत नोकरी करतात. अशा नोकरदारांचे दुपारचे जेवण हे मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांवर अवलंबून आहे. मात्र, आता डबेवाल्यांच्या रजेमुळे किमान चार दिवस तरी नोकरदारांची गैरसोय होणार आहे. याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या कालावधीत पैसे न कापण्याची विनंतीदेखील केली आहे.

सलग सुट्ट्यांचा योग

मुंबई डबेवाला असोसिएशनने सुट्ट्यांबाबत माहिती देताना सांगितले आहे की, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये नोकरदारांना डबा पोहोचवण्याचं काम डबेवाले अविरतपणे करत आहे. शाळा, महाविद्यालयांना देखील आता सुट्ट्या सुरू होणार आहेत. घरचे ताज जेवणे दुपारी मुंबईकरांना पोहचविणारे मुंबईचे डबेवाले 3 ते 8 एप्रिल असे सलग पाच दिवस सुटीवर गेले आहेत. शासकीय सुट्या व गावची जत्रा याचा योग ते साधणार आहेत. 3 आणि 4 एप्रिलला महावीर जयंती आहे. तसेच 6 एप्रिलला हनुमान जयंती आणि 7 एप्रिलला गुड फ्रायडे अशा सलग येणाऱ्या सुट्यांचा योग डबेवाले साधणार आहेत.