आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्ण दर तिपटीहून अधिक:मुंबईत प्रतिदिन 10 हजार क्षमता असताना केवळ 4 हजार चाचण्या; विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परदेशात अडकून पडलेल्यांना राज्यात आणा, राज्यात विमानांना परवानगी द्या

कोरोनाचा धोका पूर्णत: ओळखल्याशिवाय कोरोनाविरोधातील लढाई अपूर्णच राहील. मुंबईत प्रतिदिन १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि त्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेल्या आहेत. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. परदेशातील महाराष्ट्रीयन नागरिकांसंदर्भातही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, १८ मेपर्यंत एकूण झालेल्या चाचण्या आणि त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या याची आकडेवारी पाहिली तर चाचण्या वाढवण्याची गरज प्रतिपादित होते. संपूर्ण भारतात एकूण चाचण्या २३०२७९२ इतक्या झाल्या आणि त्यात ९६१६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण चाचण्यांच्या संख्येत पॉझिटिव्ह येण्याची भारताची टक्केवारी ही ४.१७ टक्के इतकी आहे, तर महाराष्ट्राची टक्केवारी १२.४३ टक्के (एकूण चाचण्या २८२००० पॉझिटिव्ह रुग्ण ३५०५८) इतकी आहे. मुंबईची आकडेवारी १३.१७ टक्के (एकूण चाचण्या १६२००० पॉझिटिव्ह रुग्ण २१३३५) इतकी आहे. याचाच अर्थ झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट अधिक आहे आणि मुंबईत तर ते त्याहून अधिक आहे. अशात एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या वजा केली तर मुंबईत पॉझिटिव्हिटीचे प्रमाण हे जवळजवळ २२ टक्के आहे. (एकाच व्यक्तीच्या दोन वा तीनदा चाचण्या केल्या जातात. रुग्णाला सुटी देण्यापूर्वी सलग दोन दिवस त्याची चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.) अशी परिस्थिती असताना मुंबईत चाचण्यांची संख्या कमी आहे. १० हजारांची क्षमता असताना केवळ चार हजारांच्या आसपास त्या होत आहेत. हे संकट पूर्णत: ओळखल्याशिवाय आणि ते हाताळण्यास सज्ज झाल्याशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अधिक चाचण्या होतात, असा केवळ दावा हा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही असेही ते म्हणाले.

परदेशात अडकून पडलेल्यांना राज्यात आणा, राज्यात विमानांना परवानगी द्या

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, अनेक देशांमध्ये महाराष्ट्रीयन नागरिक अडकून पडले असताना विमान उतरू देण्यास महाराष्ट्र सरकार परवानगी देत नसल्याने त्यांचे मायदेशी परतणे कठीण होऊन बसले आहे. राज्य सरकारने विमानांना परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. अखिल अमिराती मराठी इंडियन (आमी परिवार) यांनी कळवल्यानुसार, दुबई, अबुधाबी येथे ६ हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन अडकून आहेत. जर्मनीत १०० पेक्षा जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी, युक्रेनमध्ये ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच ऑस्ट्रेलिया व इतर देशांतही अनेक महाराष्ट्रातील नागरिक/विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे राज्यातील या नागरिकांना पुन्हा राज्यात येणे सुलभ व्हावे त्यासाठी विमान उतरण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी पत्रात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...