आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार वाढले:मुंबई जगातील 50 सर्वाधिक सुरक्षित शहरांत, मात्र 4 महिन्यांत महिलांवरील अत्याचारांत 133% वाढ

मुंबई (विनोद यादव)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. तसेच मुंबईतील हॉटस्पॉट निश्चित करून गस्त वाढवण्यास सांगितले.

ऑगस्टमध्ये इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने मुंबईचा जगातील ५० सर्वाधिक सुरक्षित शहरांत समावेश केला. मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्र वेगळीच कहाणी सांगते. मुंबईत ४ महिन्यांत महिलांवरील अपराध १३३% वाढले आहेत. वरिष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या, ‘मुंबई पोलिस आपली सर्व ऊर्जा सुशांतसिंह व राज कुंद्रा प्रकरणात लावत आहे. दिल्ली निर्भया प्रकरणानंतर मृत्युदंडाचा कायदा झाला. मात्र आजवर किती दोषींना फासावर लटकावले?

  • महाराष्ट्रात महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या सर्वात जास्त घटना मुंबई शहर आणि परिसरात होतात.
  • महाराष्ट्रात सन २०१७ मध्ये ३१९९७, २०१८ मध्ये ३५५०१ गुन्हे झाले. ते २०१९ मध्ये ४.५४% वाढून ३७,११२ वर गेले. यात ६% गुन्हे बलात्काराचे आहेत.
  • महाराष्ट्रात २०१९ मध्ये कोर्टात दाखल झालेल्या एकूण प्रकरणांपैकी ९३.४७ टक्के प्रलंबित आहेत.

महिला आयोगाचे अधिकार, दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू, (विजया रहाटकर, माजी अध्यक्षा, राज्य महिला आयोग)
महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर अद्याप राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला नाही ना सदस्यांची नेमणूक झाली. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षेसाठी जाहीर शक्ती कायदाही अद्याप लागू झालेला नाही. महिला आयोगाचे कामकाज व महिला सुरक्षेच्या दृष्टीने काय करता येईल याविषयी रहाटकर यांच्याशी केलेली बातचीत.

पीडिता व तिच्या कुटुंबाला कशा प्रकारे साहाय्य मिळवून देता येऊ शकते?
पीडितेला कायदा सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून वकील देण्याचा अधिकार महिला आयोगाला आहे. अत्याचारानंतर पीडित व कुटुंब हादरून गेलेले असते. त्यामुळे महिला आयोग त्यादृष्टीनेही मानसिक, सामाजिक आधार देते.

अायोगाला तपासाचे अधिकार असतात?
हो. पोलिस यंत्रणेला निर्देश, एसआयटी नेमता येते. त्यामुळे हे काम घटनेपुरतेच मर्यादित न राहता खोलात जाऊन घटना का घडली? कशी रोखता आली असती? असा विविध प्रश्नांवर विचार करते. त्याचा भविष्यात फायदा होतो. याशिवाय आयोग न्यायालय प्रक्रियेत हस्तक्षेप करत नाही, पण आयोगाच्या निर्णयाची दाखल घ्यावी लागते.

साकीनाकासारख्या घटना घडल्यानंतर महिला अायोगाची भूमिका काय ?
महिला अत्याचार प्रकरणात पीडिता वा तिचे कुटुंब यंत्रणेच्या कामावर समाधानी नसेल तर आयोगाकडे तक्रार करू शकतात. आयोग सुमोटोही घेऊ शकते.

मुख्यमंत्र्यांनी केल्या सूचना
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. तसेच मुंबईतील हॉटस्पॉट निश्चित करून गस्त वाढवण्यास सांगितले. साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एक महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे, जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने याप्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

साकीनाका येथील घटनेबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचून जखमी महिलेस राजावाडी रुग्णालयात दाखल केले. कुठेही वेळ दवडला नाही तसेच तातडीने संशयितास पकडले याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते.

हॉटस्पॉट निश्चित करून नियमित गस्त वाढवावी

  • महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.
  • प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस-रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.
  • स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.
  • महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.
  • गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्याची कार्यवाही लगेच सुरू करावी.
बातम्या आणखी आहेत...